सांगली : खलाटीत तरुणाचा खून, दगडाने ठेचले : विसर्जन मिरवणुकीवेळी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 04:11 PM2018-09-22T16:11:36+5:302018-09-22T16:14:32+5:30
खलाटी (ता. जत) येथील खंडू सिद्धू नाईक (वय २६) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खलाटीतील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या व्हरांड्यात शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली.
डफळापूर : खलाटी (ता. जत) येथील खंडू सिद्धू नाईक (वय २६) या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. खलाटीतील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या व्हरांड्यात शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली.
खंडू नाईक हा खलाटील नाईक वस्तीवर राहत होता. या वस्तीवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींचे शुक्रवारी विसर्जन होते. यासाठी सायंकाळी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत खंडू सहभागी झाला होता. रात्री आठ वाजता ही मिरवणूक गावात जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आली. त्यावेळी खंडू मिरवणूकीतून बाजूला होऊन शाळेकडे गेला.
मिरवणूक तशीच पुढे गेली. रात्री दहा वाजता मिरवणूक झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते वस्तीकडे निघाले होते. खंडू व्हरांड्यात झोपला असल्याचे कार्यकर्त्यांना दिसले. त्याला उठवून घरी नेण्यासाठी ते त्याच्याजवळ गेले. पण खंडू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचे डोके दगडाने ठेचल्याचे पाहून कार्यकर्त्यांना धक्का बसला.
जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शाळेच्या परिसरात तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे चौकशी केली जात आहे. पण खंडूच्या खुनाचे अजून धागेदोरे लागले नाहीत. त्यामुळे खुनाचे गूढ वाढले आहेत.