शेतकरी दुष्काळात होरपळताना सांगली जिल्हा बँकेच्या सभेत संगीत मैफल, संस्था प्रतिनिधींनी लावणीवर धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:00 PM2023-09-16T17:00:19+5:302023-09-16T17:01:01+5:30
संस्था प्रतिनिधीसाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था
सांगली : पावसाळा संपत आला तरीही ५० टक्केही पाऊस झाला नसल्यामुळे जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. या शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक काही तरी निर्णय घेण्याऐवजी शुक्रवारी सांगली जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी संगीत मैफल रंगली होती. गायनाच्या कार्यक्रमावेळी संस्था प्रतिनिधींनी लावणीवर नृत्याचा ठेका धरला. संगीत मैफलीबरोबरच भोजनावळीचेही आयोजन केले होते.
जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरू होण्यापूर्वी उपस्थित संस्था प्रतिनिधींच्या मनोरंजनासाठी गीतगायनाचा कार्यक्रम आणि सुग्रास भोजनव्यवस्था करण्यात आली होती. सभागृहात लावण्या सादर केल्या जात असताना काही जण प्रेक्षागारातून नृत्य करीत होते. तर पंगतीमध्ये फिरून काही संचालक उपस्थितांना जेवणासाठी आग्रह करीत होते.
एकीकडे जिल्हा दुष्काळाने होरपळत असताना मनोरंजनासाठी लावण्याचा कार्यक्रम आणि भोजनावळ आयोजित केल्याबद्दल काहींनी नाराजीही व्यक्त केली. सभेमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षीत होते; पण सभेपूर्वीच संगीत मैफल आणि संस्था प्रतिनिधीसाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था केली होती.