सांगलीत संगीत महोत्सव, नाट्यप्रयोगांची मुहूर्तमेढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:24 AM2021-01-21T04:24:54+5:302021-01-21T04:24:54+5:30
सांगली : कोरोनामुळे तब्बल दहा महिने थांबलेला सांस्कृतिक कार्यक्रमांचा प्रवाह आता गतीने सांगलीच्या पात्रातून खळाळणार आहे. संगीत महोत्सव, नाट्यप्रयोगांची ...
सांगली : कोरोनामुळे तब्बल दहा महिने थांबलेला सांस्कृतिक कार्यक्रमांचा प्रवाह आता गतीने सांगलीच्या पात्रातून खळाळणार आहे. संगीत महोत्सव, नाट्यप्रयोगांची मुहूर्तमेढ नव्या वर्षात रोवली गेल्याने रसिकांसाठी ही आनंदपर्वणी ठरणार आहे.
सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात यानिमित्ताने प्रयोगांचे व कार्यक्रमांचे बुकिंग सुरू झाले आहे. येत्या २४ जानेवारीस पंडित भीमसेन जोशी यांचा संगीत महोत्सव, तर २६ जानेवारीला 'वऱ्हाड निघालंय लंडनला' हा एकपात्री नाट्यप्रयोग होणार आहे. संगीत महोत्सवाच्यानिमित्ताने अनेक दिग्ग्ज गायक, वादक, तर नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने दिग्ग्ज कलाकार रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
कोरोना काळात ऑनलाईन प्रयोगांनी रसिकांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी जिवंत कला अनुभवण्यासाठी रसिक आतुर झाले होते. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे येथील नाट्यरसिक गेली दहा महिने नाट्यप्रयोगांच्या प्रतीक्षेत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. नाट्यप्रयोगांचे बुकिंग होऊ लागल्यामुळे नाटकांची घंटा पुन्हा वाजणार आहे.
प्रयोग थांबल्यामुळे कलाकार, पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ, वितरक अशा सर्वांचा रोजगार थांबला होता. या सर्व घटकांचे अर्थचक्र थांबले होते. आता हे अर्थचक्र पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे नाट्यगृहचालकांपासून सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे. नाट्यवितरकांना अद्याप रसिकांच्या प्रतिसादाचा अंदाज नसला, तरी राज्यभरात प्रयोगांना भरभरुन प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना सांगली जिल्ह्यातही असा प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.
चौकट
नियमांचे होणार पालन
प्रयोगांवरची बंधने हटली तरी, कोरोनामुळे रसिकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करून प्रयाेगाचा आनंद लुटावा लागणार आहे.
चौकट
फलक लागले, नाट्यगृह सजले
नाट्यगृहांबाहेर झळकणारे कार्यक्रमांचे फलक हे त्या रंगमंचावरील हालचालींचे प्रतीक असते. गेली दहा महिने फलकाविना नाट्यगृहाचा परिसर भकास वाटत होता. आता कार्यक्रमांच्या फलकांनी नाट्यगृहाच्या परिसराला जिवंतपणा प्राप्त झाला आहे.