इस्लामपुरात मुस्लिम नेत्यांची फिल्डिंग
By admin | Published: August 17, 2016 10:53 PM2016-08-17T22:53:03+5:302016-08-17T23:12:40+5:30
पालिका निवडणुकांवर डोळा : नेता निवडीसाठी समाजापुढे मोठे आव्हान, दोघांना संधी शक्य
अशोक पाटील -- इस्लामपूर शहरातील मुस्लिम मतांची संख्या विचारात घेता, आगामी पालिका निवडणुकीत दोघांना संधी मिळणार आहे. इस्लामपुरात काही नेते माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात, तर काही महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आता या दोघांना शह देण्यासाठी एम.आय.एम.च्या शाकीर तांबोळी यांनी मुस्लिम संघटनेच्या माध्यमातून राजकारण सुरु केले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजापुढे नेता निवडीचे आव्हान उभे राहणार आहे.
इस्लामपूर शहर हिंदू—मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून परिचित आहे. या शहरात कधीच जातीय तेढ निर्माण झाली नाही. दिवंगत राजारामबापू पाटील, एम. डी. पवार यांच्यासह आमदार जयंत पाटील यांनी मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. परंतु सध्या जातीय राजकारणाचे पेव फुटले आहे. त्यामुळे सर्व जाती-समाजांमध्ये विविध संघटना निर्माण झाल्या आहेत. इस्लामपूर शहरात शाकीर तांबोळी यांच्या माध्यमातून मुस्लिम संघटना सक्रिय झाली आहे. त्यांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी चाचपणी सुरु केली आहे. परंतु तांबोळी यांना विरोध करण्यासाठी याच समाजातील नेते सरसावले आहेत.
शहरात जेथे मुस्लिम समाजाची व्होट बँक आहे, त्याच प्रभागातून या समाजातील नेते निवडणूक लढवतात. शहरात ९ ते १0 हजारांच्या आसपास मुस्लिम समाजाची मते आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटातून एक पुरुष आणि एका महिलेला नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे. शहरातील प्रभाग क्र. ६, ८, १0 व १२ मध्ये मुस्लिम समाजाची मते जास्त आहेत. त्यातही ८ क्रमांकाच्या प्रभागात मुस्लिम मतदान जादा आहे. त्यामुळे या प्रभागातच सत्ताधारी व विरोधी गटाकडून उमेदवारांची रेलचेल असणार आहे. पीरअल्ली पुणेकर, रोझा किणीकर, आयुब हावलदार, मिनाज मुल्ला यांच्यासह माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर यांनी राष्ट्रवादीच्या ताकदीवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे, तर महाडिक गटाकडून जलाल मुल्ला, अॅड. फिरोज मगदूम यांच्या नावाची चर्चा आहे.
या दोन गटांच्या विरोधात एम.आय.एम. चे शाकीर तांबोळी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मुस्लिम समाजातून उमेदवारांची संख्या मोठी असल्याने, त्यातच एम.आय.एम. ची भर पडल्याने हा समाज नेमका कोणाकडे झुकणार, याबाबत तर्क—वितर्क लढवले जात आहेत.
एमआयएम बॅकफूटवर
एम.आय.एम.चे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी प्रारंभीच्या टप्प्यात आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु त्यांची संघटना बॅकफूटवर पडत चालली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत विरोधी महाडिक युवा शक्तीशी ते हातमिळवणी करुन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
कोण काय म्हणाले?
सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा, मुस्लिम समाजाच्या प्रश्नांची जाणीव असणारा उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे. फक्त मुस्लिम समाज मानून राजकारण करणाऱ्या नेत्यांना आमचा समाज थारा देणार नाही.
- अॅड. फिरोज मगदूम, इस्लामपूर.
मुस्लिम समाजात जातीच्या नावाखाली कितीही भूछत्र उगवले तरीही, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील हे या समाजाचे एकमेव वटवृक्ष आहेत. त्यांच्या छायेखाली आमचा समाज एकदिलाने कार्यरत आहे.
- सौ. रोझा किणीकर, शहराध्यक्षा, महिला राष्ट्रवादी