तिहेरी तलाकविरुद्ध मुस्लिम महिलांचा एल्गार : सांगलीत मोर्चा, विधेयक मागे घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:57 PM2018-02-20T18:57:25+5:302018-02-20T18:57:25+5:30
सांगली : केंद्र सरकारच्या प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकाविरुद्ध सांगलीत सोमवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला.
सांगली : केंद्र सरकारच्या प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकाविरुद्ध सांगलीत सोमवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. हे विधेयक मागे न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम महिला आंदोलनात उतरतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन दिले. तिहेरी तलाकबाबतचे विधेयक (विवाह विधेयक अधिकारी संरक्षण) मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व धर्मगुरूंचे मत न घेता, तयार करण्यात आले आहे. यास मुुस्लिम महिलांचा विरोध आहे. या विधेयकामुळे मुस्लिम कुटुंबांचे नुकसान होणार आहे. विधेयक मागे न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल. जिल्हास्तरावरुन सुरू झालेले हे आंदोलन देशव्यापी केले जाईल, असा इशारा महिलांनी दिला.
अॅड. सना कुरेशी, कौसरजबीन ढाले, अॅड. हमिदा खान, डॉ. शम्मीन पटेल, नसरीन कुरेशी, फातिमा मुल्ला, डॉ. शबनम शोख, अॅड. शफिना मुल्ला, डॉ. फरजाना मुल्ला, डॉ. तस्मया बानदार, रफिया खान, अलिमा शेख, असिफा सय्यद, तबसूम शेख यांच्यासह सांगली, मिरजेतील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. माजी महापौर मैनुद्दीन बागवान, असीफ बावा, उमर गवंडी, अय्याज नायकवडी, मुक्ती मुझम्मील, मुक्ती जबुरे, मुक्ती सादीक, मौलाना अब्दुल रौफ, मौलाना गुलास गौस बंदेनवाज, मौलाना जुबेर बेपारी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
पाण्याची सोय
उन्हाचा तडाखा वाढल्याने मुस्लिम समाजातर्फे मोर्चात सहभागी झालेल्या महिला व मुस्लिम बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वालचंद महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर पाच ते सहा ठिकाणी पाण्याच्या बॉटलचे वाटप सुरू होते.
स्वयंसेवक तैनात
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वालचंद महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मार्ग पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू राहिल्याने वाहतूक विस्कळीत बनली होती. मुस्लिम समाजाने त्यांचे स्वयंसेवक नियुक्त केले होते. हे स्वयंसेवक वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करीत होते. तसेच वाहनांचे पार्किंग रस्त्याकडेला करण्यासही त्यांनी मदत केली. मोर्चा संपल्यानंतरही सहभागी महिला जाईपर्यंत स्वयंसेवक रस्त्यावर थांबून वाहतूक सुरळीत करीत होते.