तारण जमिनीची परस्पर विक्री, महांकाली साखर कारखान्याला सांगली जिल्हा बँकेकडून फौजदारी नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:18 PM2023-08-04T12:18:28+5:302023-08-04T12:18:48+5:30
याशिवाय संबंधित खरेदी व्यवहार रद्द करण्याबाबत बँकेने जिल्हाधिकारी तसेच मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला
सांगली : जिल्हा बँकेकडे तारण असलेली ८.५६ हेक्टर जमीन परस्पर विकल्याप्रकरणी कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना बँकेने फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. याशिवाय संबंधित खरेदी व्यवहार रद्द करण्याबाबत बँकेने जिल्हाधिकारी तसेच मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.
जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी याबाबतची माहिती दिली. ऋण वसुली अपीलीय प्राधिकरणाच्या आदेशानुसार थकीत कर्ज वसुलीसाठी महांकाली कारखान्याची ८० एकर जमीन विक्री करून कर्ज परतफेड करण्यास जिल्हा बँकेने सशर्त परवानगी दिली आहे. सप्टेंबरअखेर कारखान्याने सर्व थकीत कर्ज फेडावे, अशी अट घातली आहे. यासाठी कारखान्याला बँकेने हप्ते पाडून दिले आहे.
८० एकर जमीन सोडून महांकाली कारखान्याची दुसरी १३९ एकर जमीन जिल्हा बँकेकडे कर्जासाठी तारण आहे. ही जमीन २०१७ मध्ये कारखान्याने बँकेला तारण दिली आहे. मात्र, यातील एका गटावर जिल्हा बँकेचा बोजा अद्याप चढलेला नव्हता. याचा गैरफायदा घेत या गटातील ८.५६ हेक्टर जमीन कारखान्याने शिवदत्त लॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीला विकल्याची बाब उघडकीस आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी हा बेकायदेशीर व्यवहार झाला आहे. याप्रकरणी बँकेने कारवाईचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना त्यांच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, याबाबतची नोटीस बजावली आहे. हा बेकायदेशीर व्यवहार रद्द करण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा बँकेने जिल्हाधिकारी, मुद्रांक अधिकारी व संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.
कडक कारवाई करा : फराटे
मालमत्ता परस्पर विकल्याप्रकरणी कारखान्याच्या पदाधिकारी व संचालकांवर कडक कारवाईची मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे. जिल्हा बँक व कारखान्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणीही फराटे यांनी सहकार आयुक्तांकडे केली आहे.
शाखाधिकाऱ्यांवरही कारवाई
जमीन विकत घेणाऱ्या कंपनीने बँकेशी संपर्क करून व्यवहार रद्द करणार असल्याचे सांगितले. २०१७ मध्ये ही जमीन बँकेला तारण दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत या जमीनवर बँकेचा बोजा का चढवला गेला नाही, याची विचारणा शाखाधिकाऱ्यास केली आहे. याचे उत्तर येताच संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार आहे. - शिवाजीराव वाघ, सीईओ, जिल्हा बँक