गैरकारभार रोखल्याने माझी बदनामी
By admin | Published: July 5, 2016 11:31 PM2016-07-05T23:31:33+5:302016-07-06T00:22:30+5:30
संजीवकुमार सावंत : प्रामाणिक अधिकाऱ्यांशी नम्रतेनेच बोलणार
सांगली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दर करारपत्राद्वारे बेकायदेशीर साहित्य खरेदीचा प्रयत्न केला होता. त्यास विरोध करून ई-निविदा मागविण्याची सूचना दिली होती. एका अधिकाऱ्याच्या निष्क्रिय कारभारामुळे दीड कोटीचा निधी शासनाकडे परत गेला. याविरोधात जाब विचारला, म्हणूनच तो अधिकारी माझी बदनामी करीत आहे, अशी टीका कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजीवकुमार सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
जिल्हा परिषदेतील अन्य प्रामाणिक अधिकाऱ्यांशी आपण नम्रतेनेच बोलू, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.
ते म्हणाले की, कृषी विभागाकडील योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे दीड कोटीचा निधी मिळाला होता. या निधीतून अधिकाऱ्यांनी योजना राबविल्या नाहीत, म्हणून तो निधी शासनाकडे परत गेला आहे. अर्थातच जिल्ह्याच्या विकास कामाचा निधी परत गेल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. याचबरोबरच राज्य शासनाकडून सोलर पंपासाठी सध्या दोन कोटीचा निधी मिळाला आहे. परंतु, या निधी खर्चासाठी प्रस्तावच अधिकाऱ्यांनी केला नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील विकास कामे थांबली आहेत. या अधिकाऱ्यास आम्ही सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव कृषी समितीच्या सभेत घेतला होता. या महाशयांनी विषय समितीच्या इतिवृत्तामध्येच तो ठराव घेतला नाही. त्यामुळे मी इतिवृत्तावर सही केली नव्हती. याचा अधिकाऱ्यांच्या मनामध्ये राग होता. यातूनच, मी पैसे मागत असल्याची सर्वत्र चर्चा करून माझी बदनामी करीत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करणार आहे. बदनामी करणाऱ्या या अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर काम यापुढेही करणार नाही.
औषध दुकानदाराकडून पैसे गोळा करण्याबाबत त्यांना काहीच बोललो नव्हतो. तरीही माझ्यावर द्वेषातून, दुकानदाराकडून पैसे गोळा करण्याची सूचना केल्याचे ते सांगत आहेत. मला कोणत्याही दुकानदाराकडून पैसे गोळा करण्याची काहीच गरज नाही. अधिकारी पैसे मागत असतील तर त्यांनी माझ्याकडे अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहनही सावंत यांनी केले. (प्रतिनिधी)
आधी त्यांचा आवाज वाढला...
शिक्षण समितीच्या सभेत जत तालुक्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या आणि बदल्यांसाठी गेलो होतो. यावेळी अधिकाऱ्यांना मी नम्रपणे बोलत असताना, त्यांचा माझ्याकडे पाहत आवाज वाढला. यावेळी त्यांना आपण सभापतींशी बोलत असल्याचे भान ठेवा, असे म्हणालो. त्यांचा आवाज वाढल्यामुळे माझाही आवाज वाढला होता, असे संजीवकुमार सावंत यांनी स्पष्ट केले. जत तालुक्यातील काही शिक्षक अन्य जिल्ह्यात असून, त्यांना सांगली जिल्ह्यात घेण्याची सूचना केली होती. प्रत्येकवेळा अधिकारी चुकीचा अर्थ लावून फायली पुढे जाऊ देत नाहीत. शिक्षकांची आर्थिक पिळवणूक थांबावी म्हणून अधिकाऱ्यांना बोललो आहे, असेही त्यांनी सांगितले.