आष्टा शहरात ‘माझी वसुंधरा’ ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियान जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:51 AM2021-02-21T04:51:35+5:302021-02-21T04:51:35+5:30
ओळ : आष्टा पालिकेत भिंतीवर आकर्षकरीत्या लावलेली फुलांची रोपे सेल्फी पॉइंट ठरत आहेत. लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा ...
ओळ : आष्टा पालिकेत भिंतीवर आकर्षकरीत्या लावलेली फुलांची रोपे सेल्फी पॉइंट ठरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरात ‘माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छतेचा संदेश देणारे फलक व झाडे लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर पालिकेत भिंतीवर आकर्षकरीत्या फुलांची रोपे लावल्याने ही भिंत सेल्फी पॉइंट ठरत आहे.
आष्टा शहराने संत गाडगेबाबा शहर स्वच्छता अभियानात राज्यात २००३-०४ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता. त्यानंतर प्रतिवर्षी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. देशपातळीवर शहराने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण हे पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी असताना त्यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. सध्या ते आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या विविध विभागांमध्ये तसेच मोक्याच्या जागी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. माझी वसुंधरा व स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
पालिकेत प्रवेश करताना एका भिंतीवर आकर्षकरीत्या फुलांची रोपे लावण्यात आलेली आहेत. ही रोपे व पालिकेतील स्वच्छतेचे संदेश नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट ठरत आहेत. प्रत्येक दालनात झाडे असल्याने अधिकाऱ्यांसह नागरिकांना प्रसन्न वाटत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे यांच्यासह अधिकारी आसावरी सुतार, प्रणव महाजन, आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
चौकट
अभियानास सहकार्य करा : चव्हाण
आष्टा शहरात माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू आहे. नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळावेत. ओला व सुका कचरा घंटागाडीत वेगळा टाकावा, तसेच झाडे लावावीत. स्वच्छता पाळावी. सर्व नागरिकांनी या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.