तरुणांनी उभारली ‘माझी कृष्णामाय’ चळवळ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:14 PM2018-08-05T23:14:30+5:302018-08-05T23:14:35+5:30
अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावांचे सांडपाणी पोटात घेऊन वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या वेदनांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याची जाणीव सर्वांनाच असली तरी, ती दूर करण्यासाठी कोणाचीही पावले उचलली जात नाहीत. उदासीनतेच्या या गर्दीतून बाहेर पडत नदीच्या वेदनांना फुंकर घालण्यासाठी आता काही सांगलीकर तरुणांनी कृतिशील चळवळ उभारली आहे.
‘माझी कृष्णामाय’ या नावाने सुरू झालेल्या व्हॉटस् अप ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला संकल्पनांची, विचारांची देवाण-घेवाण सुरू झाली. या ग्रुपमध्ये अभियंते, वास्तुविशारद, वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, शासकीय कर्मचारी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. या गटाच्या माध्यमातून काही दिवसातच कृतिशील कार्यक्रमांना सुरुवातही झाली. शालेय स्तरावरच नव्या पिढीच्या मनावर नदी प्रदूषण रोखण्याचे विचार बिंबविण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेण्यात आला. सर्वांची तहान भागवून आरोग्याचा मंत्र देणाºया आपल्या नदीचा आपणच कसा गळा घोटत आहोत, याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. जेणेकरून या मुलांकडून घरातील मोठ्यांनाही शहाणपण मिळेल. प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे परिणाम तूर्त काही टक्क्यांवर असले तरी त्यातून भविष्यात मोठी चळवळ उभारली जाणार आहे.
त्याचबरोबर जे सांडपाणी व कचरा नदीत मिसळतो, त्या स्रोतांमध्ये घातक सूक्ष्म जिवाणूंचे भक्षण करणाºया वनस्पती लावून त्याद्वारे जैविक प्रकल्प राबविण्याचा विचारही या चळवळीतून पुढे आला. याच्या आराखड्याचे कामही आकाराला येत आहे. काहीअंशी याचा अभ्यासही पूर्ण झाला आहे. ज्या शहरांमध्ये अशाप्रकारचा जैविक प्रकल्प राबविण्यात आला, त्याठिकाणच्या माहितीचे संकलनही झाले आहे. तत्कालीन आयुक्त अजिज कारचे यांच्यापुढे ही संकल्पना यातील काही तरुणांनी मांडली होती. कारचे यांनी या प्रकल्पासाठी हिरवा कंदीलही दर्शविला होता, मात्र त्यांच्या बदलीनंतर ही प्रक्रिया थांबली.
शासकीय पातळीवर जरी मदत मिळाली नाही, तरीही तरुणांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर कृष्णा नदीचे आरोग्य सुधारण्याचा निर्धार या ग्रुपने केला आहे. त्यास चांगला प्रतिसादही लाभत आहे.
नदीबरोबरच विहीर पुनरुज्जीवनाचा कार्यक्र्रमही हाती घेतला आहे. अशा विविध अंगाने ही चळवळ आकाराला येत आहे.
प्रदूषणाचा प्रश्न गंभीर
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातून दररोज ५ कोटी ६० लाख लिटर सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असते. यात एमआयडीसीमधून मिसळणारे सांडपाणी एक कोटी लिटर इतके आहे. याशिवाय अन्य गावांमधूनही मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळते. तरीही महापालिका क्षेत्रातील प्रदूषण रोखण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास ही चळवळ अन्यत्र राबविता येणार असल्याचे या ग्रुपचे प्रमुख प्रसन्न कुलकर्णी यांनी सांगितले.