शेतकऱ्यांसाठीच माझी आमदारकी
By admin | Published: April 19, 2016 11:52 PM2016-04-19T23:52:48+5:302016-04-20T00:32:14+5:30
अनिल बाबर : देविखिंडी येथे विकास कामांचे उद्घाटन
विटा : दर्जेदार शिक्षण, चांगले आरोग्य व शेतीला पाणी मिळाल्यानंतर शेतकरी सुखी होईल. सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी शेतीला पाणी मिळाले पाहिजे. दुष्काळ हाच आपला मोठा शत्रू आहे. तो संपविण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपली ताकद द्यावी, असे आवाहन करून दुष्काळाने होरळपणाऱ्या शेतकऱ्यांचा समस्या सोडविण्यासाठीच माझी आमदारकी असल्याचे प्रतिपादन आ. अनिल बाबर यांनी केले.
देविखिंडी (ता.खानापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, दलित वस्ती सुधार योजनेतून कॉँक्रिटीकरण यासह आमदार फंडातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी आ. बाबर बोलत होते. यावेळी सभापती सौ. वैशाली माळी, उपसभापती किसन सावंत, माजी उपसभापती सुहास बाबर, जि. प. सदस्य फिरोज शेख, बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. अंकुश निकम यांनी देविखिंडी गावाला टेंभूचे पाणी तसेच रस्ते व समाजमंदिर मंजूर करण्याची मागणी केली. तर जि. प. सदस्य फिरोज शेख यांनी काही लोकांना टेंभूबाबत अपूर्ण माहिती असताना लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा वर्षात जेवढा विकास झाला नव्हता, तेवढा विकास आ. बाबर यांनी दीड वर्षात केलेला असल्याचे सांगितले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास सरपंच शीतल माळी, उपसरपंच सुभाष निकम, प्रकाश निकम, सूर्याजी शिंदे, बबन निकम, अरूण केंगार, किशोर डोंबे, सुरेश चिंचणकर, केशव मोरे, विश्वनाथ काटकर, सोपान भारते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश निकम यांनी आभार मानले. (वार्ताहर)
यांचा झाला सन्मान...
या कार्यक्रमावेळी संत गाडगेबाबा स्वच्छ शाळा स्पर्धेत देविखिंडी प्राथमिक शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ. जयश्री निकम यांचा आ. बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संपूर्ण गाव धूरमुक्त व्हावे यासाठी वनविभागाच्यावतीने सवलतीच्या दरात देण्यात आलेले घरगुती गॅस कनेक्शन गावातील १६६ कुटुंबांना वाटप करण्यात आले. त्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीत माणसुकी जोपासणारे व स्वत:च्या विंधन विहिरीचे पाणी गावासाठी दररोज मोफत देणाऱ्या ९ ग्रामस्थांचाही यावेळी आ. बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.