म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही, धोकादायक; पण बरा होणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:20+5:302021-05-29T04:20:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे असतानाच आता म्युकरमायकोसिसच्या वाढत्या फैलावामुळे चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे असतानाच आता म्युकरमायकोसिसच्या वाढत्या फैलावामुळे चिंतेचे ढग दाटू लागले आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असली तरी दररोज एक-दोन रुग्णांची भर पडत आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिल्याने दिलासा मिळाला आहे.
सध्या जिल्ह्यात तेरा रुग्णालयांत म्युकरमायकोसिसवरील उपचार सुरू आहेत. गुरुवारअखेर ११० रुग्ण म्युकरमायकोसिसने बाधित झाले असून सहा जणांचा मृत्यू ओढावला आहे. उपचारांसाठीच्या इंजेक्शन्सची उपलब्धता जिल्हा परिषदेतच केली आहे. औषधोपचारांची सोय झाली तरी खर्च आवाक्याबाहेर असल्याने चिंतेचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिसला तोंड देण्याची तयारी केली आहे. कान, नाक, घसातज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ उपचारांसाठी सरसावले आहेत.
म्युकरमायकोसिसमुळे डोळे गमावण्याचा धोका आहे. जीवही गमवावा लागतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच निदान होणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या निदानानंतर १५ ते २० दिवसांनी सायनसमध्ये म्युकरमायकोसिस तयार होऊ लागतो. कोरोना उपचारावेळी स्टेरॉइडच्या अतिवापराने म्युकरमायकोसिस बळावतो. औषधांचा जास्त वापर, प्रतिजैविकांचे अतिरिक्त डोस यामुळेही धोका वाढत आहे.
हा आजार धोकादायक असला तरी तो योग्य उपचाराने बरा होऊ शकतो. त्याचे औषध उपलब्ध आहे ही दिलासादायी बाब ठरली आहे.
चौकट
म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
चेहऱ्यावर सूज, तो दुखणे, डोळ्यांवर सूज, डोळ्यांचा पांढरा भाग लालसर होणे, डोळा बाहेर आल्याची भावना होणे, नजर कमकुमत होणे, अंधुक दिसणे ही काही लक्षणे आहेत. नाकातून स्राव, नाकाअंतर्गत सूज, वेदना हीदेखील चिन्हे आहेत. अर्थात प्रत्येक वेळा डोळा दुखणे किंवा लाल होणे म्हणजे म्युकरमायकोसिस समजून डॉक्टरकडे धाव घेणे योग्य ठरत नाही, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
चौकट
ही घ्या काळजी
अशी लक्षणे दिसताच रुग्णांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही योग्य ठरते. सोशल मीडियावरील सल्ले आणि अैाषधांकडे डोळेझाक केलेलीच बरी. मधुमेहावर नियंत्रणदेखील महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यातील निदान डोळे आणि प्राण दोन्ही वाचवू शकते.
चौकट
कोल्हापुरातून मिळतात जेमतेम इंजेक्शन्स
- म्युकरमायकोसिसवरील महागडी इंजेक्शन्स खासगी अैाषध दुकानांत उपलब्ध नाहीत. प्रशासनाने जिल्हा परिषदेत कोरोना नियंत्रण कक्षाजवळ मिळण्याची सोय केली आहे.
- दररोजच्या मागणीनुसार पुरेशी इंजेक्शन्स उपलब्ध होत नाहीत. प्रत्येक रुग्णाला दररोज किमान पाच इंजेक्शन्स द्यावी लागतात, त्यामुळे मागणी जास्त आहे.
- कोल्हापुरातील औषध भांडारातून दररोज इंजेक्शन्स येतात. त्यामुळे डॉक्टरांनी म्युकरमायकोसिसच्या रुंग्णाची संख्या दररोज कळवल्यास इंजेक्शन्स उपलब्ध करणे सोयीचे होईल, असे आवाहन शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
पॉइंटर्स
जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण ११०
गुरुवारअखेर मयत झालेले ६
आठवडाभरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संंख्या ७८ वरून ११० वर गेली आहे. त्यातील सहा जणांचे मृत्यूही झाले आहेत. मरण पावलेले रुग्ण कोरोनावर मात करून बाहेर पडले होते; पण काहींना मधुमेहाचा विकार होता. त्यामुळे म्युकरमायकोसिसवर ते मात करू शकले नाहीत.
डॉक्टर म्हणतात...
म्युकरमायकोसिसवर वेळेत आणि योग्य उपचार झाले नाहीत तर दृष्टी गमावण्याचा धोका असतो. मधुमेहावर नियंत्रण, प्रतिजैविकांचा वापर, ॲम्फोटेरेसीन अैाषधांचा वापर याद्वारे म्युकरमायकोसिसमधून रुग्ण बरा होऊ शकतो.
- डॉ. सुधीर कदम, कान-कान-घसातज्ज्ञ, मिरज
म्युकरमायकोसिसवर उपचार करताना डॉक्टरांनीही खबरदारी घेतली पाहिजे. रुग्णाचा मधुमेह, स्टेरॉइडचा वापर हे संदर्भ लक्षात ठेवायला हवेत. काळी बुरशी नाकातून टाळू व मेंदूपर्यंत प्रवास करते; पण योग्य उपचारांनी निश्चित बरी होते. रुग्णांनीही लक्षणे दिसताच तात्काल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. राहुल गोसावी, मिरज
- हा आजार नवा नाही. अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. ज्या रुग्णांची प्रतिकारक्षमता काही कारणांनी कमी होते, त्यांना उद्भवू शकतो. मधुमेह वाढल्यानेही म्युकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यावर मधुमेहावर लक्ष ठेवणे, नियंत्रण करणे आवश्यक ठरते.
- डा. प्रिया प्रभू-देशपांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज