म्हैसूर-धारवाड एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार होणार! बेळगावच्या संघटनांचाही आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:40 PM2020-01-11T23:40:46+5:302020-01-11T23:42:23+5:30
दक्षिण-प्श्चिम विभागाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार एक्स्प्रेस गाडी म्हैसूरमधून सध्याच्या रात्री साडेदहाऐवजी दीड तास अगोदर म्हणजे नऊ वाजता सुटेल. हुबळीमध्ये पहाटे ७.१० ऐवजी साडेसहा वाजता येईल. बेळगावमध्ये सकाळी सव्वानऊ वाजता व मिरजेत दुपारी १.२० वाजता पोहोचेल. मिरजेतून दुपारी ३.१० वाजता परतीचा प्रवास सुरु होईल.
सांगली : म्हैसूर ते धारवाड एक्स्प्रेस सांगलीपर्यंत विस्तारित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बेळगावातील प्रवासी संघटनांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना याबाबत साकडे घातले आहे.
म्हैसूर ते धारवाड एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १७२०१) दररोज धावते. ती मिरजेपर्यंत विस्तारित करण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या दक्षिण-प्श्चिम विभागाने गेल्या जून महिन्यात तयार केला. तो हुबळी आणि म्हैसूर विभागीय व्यवस्थापकांना पाठवला. यासाठी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना पुढाकार घेतला होता.
हा प्रस्ताव बेळगावमधील प्रवासी संघटनांनी उचलून धरत ही एक्स्प्रेस सांगलीपर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली आहे. मिरजेत दहा मिनिटांच्या थांब्यानंतर पुढे सांगलीला येईल व अर्धा तासांच्या विश्रांतीनंतर परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होईल, असा प्रस्ताव आहे. सांगलीतून थेट बेळगाव-म्हैसूरसाठी सुटणारी गाडी नाही. त्यामुळे राज्यमंत्री अंगडी या विस्ताराबाबत सकारात्मक असल्याचे संघटनांनी सांगितले.
मिरजेत सध्या गाड्यांसाठी पुरेसे प्लॅॅटफॉर्म उपलब्ध नाहीत. सांगलीत तीन प्लॅटफॉर्म व तीन अतिरिक्त लूप लाईन्स असल्याचा फायदा प्रस्तावित एक्स्प्रेसला मिळेल. यापूर्वी सांगली बेळगाव-पॅसेंजरचाही प्रस्ताव होता, पण पुणे विभागाने तांत्रिक कारण देऊन तो नाकारला. त्याऐवजी आता म्हैसूर-सांगली एक्स्प्रेससाठी विचार सुरू आहे.
दक्षिण-प्श्चिम विभागाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार एक्स्प्रेस गाडी म्हैसूरमधून सध्याच्या रात्री साडेदहाऐवजी दीड तास अगोदर म्हणजे नऊ वाजता सुटेल. हुबळीमध्ये पहाटे ७.१० ऐवजी साडेसहा वाजता येईल. बेळगावमध्ये सकाळी सव्वानऊ वाजता व मिरजेत दुपारी १.२० वाजता पोहोचेल. मिरजेतून दुपारी ३.१० वाजता परतीचा प्रवास सुरु होईल. बेळगावमध्ये संध्याकाळी ५.४०, हुबळीमध्ये रात्री ९.३५ व म्हैसूरमध्ये सकाळी ७.०५ वाजता पोहोचेल. यात थोडा बदल करुन एक्स्प्रेस सांगलीपर्यंत विस्तारित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुपचे उमेश शहा यांनी दिली.
‘म्हैसूर-धारवाड एक्स्प्रेस सांगलीपर्यंत विस्तारित करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तेदेखील सकारात्मक आहेत. नव्या गाड्या सुरू करणे किंवा सध्याच्या गाड्या विस्तारित करणे याचे अधिकार आता सरव्यवस्थापकांकडे आल्याने म्हैसूर-सांगली एक्स्प्रेससाठी रेल्वे बोर्डाच्या मान्यतेची गरज नाही. त्यामुळे नवी एक्स्प्रेस लवकरच धावू शकते’.
- प्रा. कृष्णा आलदर, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती