संशयित शिवाजी कोळींबाबत गूढ

By admin | Published: December 6, 2015 12:36 AM2015-12-06T00:36:53+5:302015-12-06T00:37:37+5:30

किडनी रॅकेट प्रकरण : अकोल्यात पोहोचलेच नाहीत

Mysteries about the suspected Shivaji Koli | संशयित शिवाजी कोळींबाबत गूढ

संशयित शिवाजी कोळींबाबत गूढ

Next

सांगली/आष्टा : अकोला जिल्ह्यातील बहुचर्चित किडनी रॅकेटप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले बहादूरवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजी महादेव कोळी अकोला पोलिसांत स्वत:हून शरण येण्यासाठी निघून दोन दिवस झाले असले, तरी ते शनिवारी दुपारपर्यंत पोहोचलेच नव्हते. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. कोळी नेमके कोठे गेले आहेत, याची माहिती घेण्यासाठी अकोला पोलिसांनी आष्टा पोलिसांशी संपर्क साधला आहे. आष्टा पोलिसांनीही कोळी यांच्या घरी जाऊन माहिती घेतली आहे.
अकोला पोलिसांनी किडनी विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी तेथील डबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत दोन संशयितांना अटक झाली आहे. तपासात सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी येथील शिवाजी कोळी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. अकोला पोलिसांनी कोळी यांच्याशी संपर्क साधून चौकशीला हजर होण्याची सूचना केली होती, पण ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यासाठी अकोल्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पथक शुक्रवारी सांगलीत दाखल झाले होते. आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमण यांची मदत घेऊन त्यांनी बहादूरवाडीतील कोळी यांच्या घरावर छापा टाकला; पण कोळी घरी नव्हते. ते स्वत:हून शरण होण्यास अकोल्याला गेल्याचे घरच्यांनी सांगितले होते. त्यामुळे पथकाला हात हलवत परतावे लागले होते. पथक जाऊन २४ तासांचा कालावधी पूर्ण होत आला तरी कोळी अकोल्यात हजर झाले नाहीत. शनिवारी दुपारी तीनपर्यंत तरी ते हजर झाले नव्हते, असे अकोला पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, शनिवारी दुपारी कोळी यांच्या घरी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने भेट दिली. त्यावेळी घरी कोळी यांच्या पत्नी रुक्मिणी होत्या. त्यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता त्या म्हणाल्या, ‘माझे पती शिवाजी कोळी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर आहेत. दोन वर्षांनंतर ते सेवानिवृत्त होणार आहेत. मध्यंतरीच्या काळात मी आजारी होते. औषधोपचारासाठी पतीने जमीन विकली होती. ते दररोज महाविद्यालयात ड्युटीवर जातात. ते कधीही अकोल्याला गेले नाहीत. त्यामुळे त्यांचा किडनी रॅकेटशी कोणताही संबंध नाही. जर संबंध असता, तर माझ्या औषधोपचारासाठी त्यांनी जमीन विकली नसती.’ (प्रतिनिधी/वार्ताहर)
कोळी सरकारी साक्षीदार?
कोळी यांचा रॅकेटशी संबंध नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. एका व्यक्तीची किडनी देण्यासाठी त्यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली असल्याचे समजते. त्यामुळे पोलीस त्यांना सरकारी साक्षीदार करणार आहेत, असेही समजते. यासाठी त्यांचा जबाब घेण्यासाठी अकोला पोलीस बहादूरवाडीत आले होते. कोळी या रॅकेटशी कसे संपर्कात आले, याचाही उलगडा करायचा आहे. त्यामुळे पोलीस त्यांची चौकशी करण्यास प्रयत्नशील आहेत.
शिवाजी कोळी शुक्रवारीच अकोला पोलिसांत शरणागतीसाठी गेले आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली होती; पण ते अद्याप पोहोचलेले नाहीत. ते कोठे आहेत, याची आम्ही व अकोला पोलीस संयुक्तपणे माहिती घेत आहोत.
- पी. डी. पोमण, पोलीस निरीक्षक, आष्टा
 

Web Title: Mysteries about the suspected Shivaji Koli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.