जयंतरावांच्या पोस्टरवरून ‘एन. ए.’ हद्दपार, हल्लाबोल आंदोलनाच्या पोस्टरची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:24 AM2018-04-04T00:24:59+5:302018-04-04T00:24:59+5:30
इस्लामपूर : शहरात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या एन. ए. गु्रपचा दबदबा आता कमी झाला आहे. आघाडी शासनात मंत्री असताना जयंत पाटील यांनी या गु्रपला मोठी ताकद दिली होती. गांधी चौकात जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला एन. ए. गु्रप गगनचुंबी डिजिटल उभे करत होता. आता मात्र अलीकडील काही वर्षात एन. ए. गु्रपची ताकद कमकुवत झाली असून, गांधी चौकातील पोस्टरवरही या गु्रपला स्थान नाही. आता त्यांची जागा इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घेतली आहे.
इस्लामपूर शहराच्या राजकारणात एन. ए. गु्रपला अनन्यसाधारण महत्त्व होते. नाना-आबा यांच्या जोडीने पालिका निवडणुकीसह सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतून नाव केले होते. शहराची शान असलेल्या गांधी चौकातील ठरलेल्या ठिकाणी दरवर्षी जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भले मोठे डिजिटल गु्रपतर्फे उभारले जायचे. ते पुढच्या वाढदिवसालाच उतरवले जात होते. त्यांच्या ठरलेल्या जागेवर अथवा त्या कडेला कोणीही दुसरे डिजिटल लावायचे नाही, असाच अलिखित करार होता. परंतु जाधव बंधू खून प्रकरणात एन. ए. गु्रपचे जयवंत पाटील (आबा) अडकल्याने या गु्रपला उतरती कळा लागली. त्यानंतर खंडेराव जाधव (नाना) यांनी या गु्रपला सावरण्याचा प्रयत्न केला. एन. ए. गु्रपला थोडे मागे ठेवत त्यांनी एन. ए. परिवाराची संकल्पना पुढे आणली. यातून अनेक उपक्रम राबविले. गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. परंतु पालिका निवडणुकीनंतर एन. ए. परिवारही सक्रिय नसल्याचे दिसते.
फलकावरून नाव हटविले
हल्लाबोल सभेसाठी गांधी चौकात उभारण्यात आलेल्या डिजिटलवरूनही या गु्रपचे नाव काढण्यात आले आहे. आता खंडेराव जाधव यांच्या छायाचित्रासह इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी एवढाच उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या गु्रपविषयी उलट-सुलट चर्चेलाही उधाण आले आहे. ग्रुपच्या अस्तित्वाबद्दल बोलले जात आहे.
इस्लामपूर येथील गांधी चौकात लावलेल्या याच फलकावरून उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.