‘टेंभू’ला आता नाबार्डचे अर्थसाहाय्य

By admin | Published: June 8, 2017 11:23 PM2017-06-08T23:23:09+5:302017-06-08T23:23:09+5:30

‘टेंभू’ला आता नाबार्डचे अर्थसाहाय्य

NABARD's financial assistance to 'Tembhu' now | ‘टेंभू’ला आता नाबार्डचे अर्थसाहाय्य

‘टेंभू’ला आता नाबार्डचे अर्थसाहाय्य

Next


प्रताप महाडिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : दुष्काळाने होरपळणाऱ्या वंचित लाभक्षेत्राला टेंभू योजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. नाबार्डकडून अवर्षणप्रवण क्षेत्रामधील टेंभू योजनेला दोन वर्षाकरिता दोनशे कोटीचा निधी आता मिळाला आहे. नाबार्डचे अर्थसाहाय्य घेऊन टेंभू योजना आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
मागीलवर्षी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन कार्यक्रमात ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांचा समावेश झाला आहे. त्यामुळे त्या योजनांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे टेंभू योजनेचाही पंतप्रधान कृषी सिंचन प्रकल्प कार्यक्रमात समावेश झाला असता, तर या योजनेला राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीचा ‘बुस्टर डोस’ मिळाला असता. परंतु तांत्रिक कारणामुळे टेंभू योजनेचा समावेश झाला नाही. आता नाबार्डचे अर्थसाहाय्य हाच योजनेच्या पूर्णत्वाचा एकमेव मार्ग आहे. आता प्राप्त झालेल्या निधीमधून टप्पा क्रमांक ४ व ५ कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे.
टेंभूसह ताकारी व म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असल्यामुळे कृष्णा खोरेच्या वाट्याचे पाणी कर्नाटक व आंध्रमध्ये जात आहे. हे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात आणले पाहिजे. नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने सिंचनासाठी २५ हजार कोटींची तरतूद केली आहे, पण प्रगत महाराष्ट्रात मात्र सिंचनासाठी निधीची तरतूद तुटपुंजी ठरत आहे. दोन राज्यांमधील हा तुलनात्मक फरक योजनांच्या वास्तवाचेही दर्शन घडविणारा ठरत आहे. अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून वंचित दुष्काळग्रस्त लाभक्षेत्राची तहान भागविण्याचे मोठे आव्हान राज्यकर्त्यांसमोर आहे.
१ फेब्रुवारी १९९६ रोजी मान्यतेवेळी १,४१६ कोटींचा खर्च असलेल्या या योजनेचा २००४ मध्ये २,१०६ कोटी रुपये खर्चाचा पहिला सुधारित प्रशासकीय अहवाल मंजूर झाला. त्यानंतर मागील वर्षी ३,८८० कोटी रुपये खर्चाचा दुसरा सुधारित प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला होता. या अहवालात राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून प्रचलित दरसूचीनुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. आता या दुरुस्त्या करून ४ हजार ८१५ कोटींचा दुसरा सुधारित प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी शासनाकडे सादर होणार आहे. त्याची छाननी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून सुरू असून समितीने उपस्थित केलेल्या शेऱ्यांची पूर्तता करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर प्रगतीपथावर आहे.
२१० गावांचा प्रश्न कायमचा सुटणार यापुढे कालव्यांऐवजी बंदिस्त जलवाहिन्यांमधून पाणी नेणार, टेंभू प्रकल्प चालविण्यासाठी आवश्यक वीज निर्मिती सौरऊर्जेवर करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र यासाठी भरीव निधीची तरतूद होणे गरजेचे आहे.
टेंभू योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सांगली जिल्ह्यात कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील २१० गावांचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
तासगाव तालुक्यातील विसापूर-पुणदी योजनेद्वारे अग्रणी नदीत पाणी नेऊन सोडणे, कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव वितरिका पूर्ण करणे, नागज, आरेवाडी, तसेच नांगोळे तलावातून पाणी पुढे घेऊन जाणे, ही कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी कोकळे हद्दीपर्यंत पुढे जाणार आहे.
पोटकालव्यांची कामे पूर्ण होणे गरजेचे
सध्याच्या नियोजनानुसार केवळ ओढ्यांनी पाणी येऊन उपयोगाचे नाही. पोटकालव्यांची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. याशिवाय ठिबक सिंचन पद्धती अवलंबावी लागणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल आणि शेतकऱ्यांवरील पाणीपट्टीचा व वीज बिलाचा भुर्दंड कमी होईल.
या योजनेअंतर्गत एकूण ३५० किलोमीटरचे कालवे आहेत. त्यापैकी २०८ किलोमीटर कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित लाभक्षेत्र मात्र अद्याप या योजनेच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. ही कामे नाबार्डच्या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून पूर्ण होण्यास मदत होणार आहेत.

Web Title: NABARD's financial assistance to 'Tembhu' now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.