पारंपरिक पूजा, गुलालाची उधळण, प्रतिकात्मक नाग मूर्तीची मिरवणूक; शिराळ्यात नागपंचमी शांततेत साजरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 06:42 PM2023-08-21T18:42:14+5:302023-08-21T18:48:28+5:30
मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी
विकास शहा
शिराळा : "अंबाबाई च्या नावाने चांगभले" च्या गजरात लाखो भाविकांच्या शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी २००२ पासून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत प्रतिकात्मक नाग मूर्तीची मिरवणूक काढून शांततेत साजरी करण्यात आली. या वर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
अंबामाता मंदिरात देवीचे दर्शन, पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत , मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा , पालखी पूजा , घरी महिलांनी नाग मूर्तीची पूजा करून यावर्षी नागपंचमी साजरी केली. जिवंत नागांचे दर्शन न झाल्याने भाविकांमध्ये नाराजी होती.
नागपंचमी सण साजरा झाल्याने भाविकात व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नाग मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सकाळच्या सुमारास नागाच्या प्रतिमेचे पुजन करून आंबामातेचे दर्शन घेतले.
मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी एक च्या दरम्यान मानाच्या पालखीचे प्रमोद महाजन, रामचंद्र महाजन यांच्या घरी पूजन होऊन ही पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी आली. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, सुनीता नाईक यांनी पालखीचे पूजन केले. पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी आल्यावर मिरवणुकीस सुरुवात झाली.
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या प्रशासनाने १३५ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरात विविध ठिकाणी ७ तपासणी नाके उभारले होते. पोलीस विभागाकडून १६ व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरण करण्यात आले. वाद्यांच्या ध्वनी मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बारा ध्वनिमापक यंत्रे ठेवण्यात आली होती. तसेच आरोग्य विभागामार्फत आवश्यक औषधांचा साठा व सर्पदंशाची लस उपलब्ध केल्या होत्या.