Sangli: शिराळ्यात वर्षापासून "नागमणी" विश्रामगृह बंद, खानसामा नसल्याने पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:19 PM2024-11-29T16:19:49+5:302024-11-29T16:19:49+5:30
विकास शहा शिराळा : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची शान असणारे "नागमणी" शासकीय विश्रामगृह वर्षभरापासून खानसामा नसल्याने स्मारक बनून राहिले ...
विकास शहा
शिराळा : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची शान असणारे "नागमणी" शासकीय विश्रामगृह वर्षभरापासून खानसामा नसल्याने स्मारक बनून राहिले आहे. हे विश्रामगृह निवडणूक पार्श्वभूमीवर येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी उघडले होते. मात्र, खानसामाची नेमणूक नसल्याने अधिकाऱ्यांना बाहेरून जेवणाच्या डब्याचा सहारा घ्यावा लागला होता. विश्रामगृह एक वेगळे आकर्षण आणि चटकदार जेवणासाठी प्रसिद्ध होते. खानसामा निवृत्त झाले. मात्र, दुसऱ्या खानसामाची नेमणूक करण्यात न आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. एक खानसामा नसल्याने आता खासदार, आमदार, मंत्री यांची होणार पंचाईत होत आहे.
याठिकाणी जुने दोन कक्ष असणारे विश्रामगृह होते. मात्र, हे अपुरे होते. १९९५ मध्ये तत्कालीन माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी खास नागमणी विश्रामगृह मंजूर केले. यामध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वारणा व दुसरे मोरणा असे दोन कक्ष बांधण्यात आले. येथील असणारी रचना व व्यवस्था पाहून माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे अशाचप्रकारे विश्रामगृह मंजूर केले.
नागमणीमध्ये दुसरे महत्त्वाचे म्हणजे खानसामा हिंदुराव घाटगे हे. सुरुवातीपासून ते याठिकाणी कार्यरत होते. त्यांच्या जेवणाची ख्याती मंत्र्यांच्या पासून सामान्यांच्या पर्यंत होती. यामुळे या विश्रामगृहास एक वेगळेपण आले होते. यामुळे येथे सतत अधिकारी, नेते आदींची वर्दळ होती. काही महिन्यांपूर्वी खानसामा घाटगे हे सेवानिवृत्त झाले. खानसामा निवृत्त झाले मात्र, त्या अगोदर दुसऱ्या खानसामांची नेमणूक होणे आवश्यक होते, परंतु ती झाली नाही. यामुळे येथे येणाऱ्यांना आता जेवणच काय पण पाणीसुद्धा मिळत नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाला कुलूप लावले आहे.
खानसामा नसलेल्या काळात येथील राजकीय नेत्यांच्यासाठी आपापली सोय करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वरिष्ठ अधिकारी येणार त्यामुळे निवृत्त खानसामा घाडगे यांनाच या दरम्यान काम करण्यासाठी बोलावले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी खानसामा नसल्याने बाहेरून जेवण आणावे लागले होते.
पर्यटन विकास कुठेय?
तालुक्यात पाटबंधारे विभागाचे चांदोली येथे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिराळा व टाकवे येथे पंचायतचे विश्रामगृह आहेत. चांदोली, टाकवे व शिराळा असे तिन्हीही विश्रामगृह बंद अवस्थेत आहेत. एकीकडे पर्यटनस्थळे विकसित करण्याचे धोरण आखले जाते, मात्र विश्रामगृहाची ही अवस्था !