नागपंचमीसाठी शिराळ्यात कडकडीत बंद
By admin | Published: July 2, 2015 11:36 PM2015-07-02T23:36:25+5:302015-07-02T23:36:25+5:30
चक्री उपोषण सुरू : जिवंत नागाच्या पूजेस परवानगी देण्याची मागणी
शिराळा : शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागपूजा व मिरवणुकीसाठी परवानगी मिळावी, याबाबतचा कायदा शिथिल करावा, या मागणीसाठी गुरुवारी कडकडीत बंद पाळला. शुक्रवार, दि. ३ रोजी वाघवाडी फाटा (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
या प्रश्नावर दि. २९ जूनपासून राजेंद्र माने बेमुदत उपोषणास बसले होते. त्यांना पाठिंबा म्हणून गुरुवारपासून शिराळा बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थ, नाग मंडळाचे सदस्य, व्यापारी वर्गाने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी नागपंचमी पूर्ववत व्हावी, अशा घोषणा देण्यात आल्या, शंखध्वनीही करण्यात आला.
सरपंच गजानन सोनटक्के, उत्तम निकम, केदार नलवडे, चेतन पाटील, बबलू शेळके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख, अविनाश चितुरकर, गणेश आवटे, शिवाजी शिंदे, लालासाहेब शिंदे, संभाजी गायकवाड, बसवेश्वर शेटे, मुस्लिम संघटनेचे के. वाय. मुल्ला, रफीक मुल्ला, हरुण मणेर, औरंगजेब मुल्ला, अविनाश खोत उपस्थित होते.
दुपारी आमदार शिवाजीराव नाईक यांनी केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. यावेळी जावडेकर यांनी, रविवार, दि. ५ जुलै रोजी शिष्टमंडळाची भेट घेण्याचे आश्वासन दिले. नागपंचमीबाबत सर्व माहिती व कायदेशीर बाबींची माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. त्यानंतर आ. नाईक यांच्याहस्ते सरबत घेऊन राजेंद्र माने यांनी उपोषण सोडले. यावेळी पंचायत समिती उपसभापती सम्राटसिंह नाईक उपस्थित होते.
गेले तीन दिवस तहसीलदार विजय पाटील यांनी उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. (वार्ताहर)
‘शिराळा बंद’ सुरूच
राजेंद्र माने यांनी बेमुदत उपोषण सोडल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने चक्री उपोषणास सुरुवात केली. सरपंच गजानन सोनटक्के उपोषणास बसले. शिराळा बंद सुरूच राहणार असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने जाहीर करण्यात आले. दि. ३ रोजी सकाळी ११ वाजता शांततेच्या मार्गाने राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ होणार आहे. रविवार, दि. ५ जुलै रोजी केंद्रीय वनमंत्री जावडेकर यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहे. पुढील निर्णयाबाबत तातडीने रात्री बैठक घेण्यात आली.