न्यायालय आदेशाप्रमाणेच नागपंचमी
By Admin | Published: July 25, 2016 10:57 PM2016-07-25T22:57:25+5:302016-07-25T23:06:57+5:30
शीतलकुमार यादव : शिराळा येथे अधिकाऱ्यांची सामूहिक बैठक
शिराळा : शिराळा येथे ७ आॅगस्ट रोजी साजरी होणारी नागपंचमी प्रशासन व नागरिकांच्या समन्वयाने शांततेत पार पाडावी, यासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही नागपंचमी साजरी करावी, असे आवाहन प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसीलदार शीतलकमार यादव यांनी केले. येथील तहसील कार्यालय सभागृहात नागपंचमी नियोजनासाठी आयोजित सर्वपक्षीय, नागरिक, शासकीय अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.
सुरुवातीस मागील वर्षाच्या बैठकीचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी प्रांताधिकारी यादव म्हणाले की, प्रथम नगरपंचायत म्हणून ही नागपंचमी साजरी होत आहे. सर्व शहरातील गटारी, मिरवणूक मार्ग, अंबामाता मंदिर परिसर याची स्वच्छता चालू असून औषध फवारणी केली जाणार आहे. शुद्ध पाणी पुरवठा, घरा-घरामध्ये मेडिक्लोरचे वाटप, पथदिव्यांची दुरुस्ती, स्टॉलधारकांना जागा वाटप आदी कामे करण्यात येणार आहेत. सर्व शासकीय यंत्रणेच्या समन्वयासाठी कंट्रोल रूम ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीसाठी सर्व नागराज मंडळांनी परवानगी घ्यावी. अन्न-औषध प्रशासन विभागाने विषबाधा टाळण्यासाठी सर्व हॉटेल व्यावसायिकांची तपासणी करावी. याअगोदर शासन यंत्रणेकडून काही चुका झाल्या असतील, तर त्यात यावेळी नक्की सुधारणा करू. जेणेकरून भाविक-नागरिक यांची गैरसोय होणार नाही. नागपंचमी शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे. न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनीही जो आराखडा ठरविला आहे, तो कागदावरच न राहता सर्व अंमलात आणावा, असा आदेशही देण्यात आला आहे. नागपंचमीसाठी वनक्षेत्रपाल, कर्मचारी आदी १७८ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. दहा गस्तीपथके सध्या कार्यरत आहेत.
नागपंचमीदिवशी मिरवणुकीसाठी नऊ पथके असणार आहेत. नागपंचमीवेळी न्यायालयाच्या आदेशाची तसेच न्यायिक कायद्याच्या माहितीसाठी पथनाट्य, पोस्टर लावणे, रॅली आदीचे आयोजन करण्यात येणार आहे.
गटविकास अधिकारी यशवंत भांड म्हणाले की, नागपंचमीदिवशी नऊ आरोग्य पथके, ग्रामीण रुग्णालयात खास कक्ष, सांगली येथील एक पथक असणार आहे. सध्या ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात ११२६ सर्पदंशावरील लसी, ८८४ श्वानदंशावरील लसी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस एस. एल. दाभोळे, डी. डी. शेटे, डी. के. यमगर, पं. स. सदस्य लालासाहेब तांबीट, बसवेश्वर शेटे, संभाजी गायकवाड, संतोष हिरुगडे, दिलीप कदम, राम पाटील, नायब तहसीलदार राजाराम शिद, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर गायके, भगवान शिंदे, वसंत कांबळे, महादेव कुरणे, सत्यजित कदम, एल. एस. घोरपडे, नाग मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. नायब तहसीलदार के. जे. नाईक यांनी आभार मानले. (वार्ताहर)
प्रशासन सज्ज
पोलिस विभागाकडून एक उपविभागीय पोलिस अधिकारी, १२ पोलिस निरीक्षक, २२ सहा. पोलिस निरीक्षक, २६१ पोलिस, २५ महिला पोलिस, ५० वाहतूक शाखा पोलिस, १० व्हिडीओ कॅमेरे, ध्वनीमापन यंत्रे अशी व्यवस्था राहणार आहे. यावेळी वीज वितरण कंपनी, एसटी आगार, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींकडून व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यात आली.