नागनाथअण्णांच्या स्मृतिदिनी २२ ला कार्यक्रम
By admin | Published: March 16, 2016 10:22 PM2016-03-16T22:22:13+5:302016-03-16T23:54:16+5:30
वैभव नायकवडी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची उपस्थिती
वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा चौथा स्मृतिदिन २२ मार्च रोजी साजरा होत आहे. अण्णांचे विचार व कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचून राष्ट्र उभारणीस स्फूर्ती व प्रेरणा मिळावी, या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली.
नायकवडी म्हणाले की, नागनाथअण्णा व समाजवादी विचारसरणीचा दृढ संबंध होता. यामुळेच देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. सातारचे माजी खासदार प्रतापराव भोसले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, आमदार पतंगराव कदम, कुसूमताई नायकवडी यांच्यासह राज्यभरातून चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
२२ रोजी सकाळी साडेसहा ते नऊ या वेळेत समाधीस्थळी आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता हुतात्मा विद्यालयाच्या पटांगणावर जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमास नागनाथअण्णांवर प्रेम करणारे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, धरणग्रस्त संघटना, साखर कामगार, शैक्षणिक, सहकारी, सांकृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सुमारे ५१ हजाराहून अधिक लोकांची उपस्थिती गृहित धरली असून, त्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे, असे नायकवडी यांनी सांगितले.
क्रांतिवीर नागनाथअण्णांसारख्या नेत्याचा आदर्श तरूण पिढीस कळावा आणि भारत देश बलवान व्हावा, यासाठी तरूण कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नायकवडी यांनी केले.
यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा वंदना माने, माजी अध्यक्ष महादेव कांबळे, दूध संघाचे अध्यक्ष व वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, उपाध्यक्ष भगवान पाटील, बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, बझारचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, हुतात्मा किसन अहिर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. होरे, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. कांबळे, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, बझारच्या कार्यवाह नंदिनी नायकवडी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस, दूध संघाचे कार्यकारी संचालक एन. एम. मंडलिक, बझारचे व्यवस्थापक मारूती चव्हाण यांच्यासह हुतात्मा संकुलातील कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार
नागनाथअण्णा व समाजवादी विचारसरणीचा दृढ संबंध होता. यामुळेच देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे. सातारचे माजी खासदार प्रतापराव भोसले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, आ. पतंगराव कदम उपस्थित राहणार आहेत.