नागपंचमी : उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे : अभिजीत चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:02 PM2019-08-01T14:02:26+5:302019-08-01T14:08:06+5:30
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. कायद्याचा आदर राखून, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, नागरिकांनी नागपंचमी उत्सव साजरा करावा. उत्सव साजरा करताना कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
सांगली: बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. कायद्याचा आदर राखून, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, नागरिकांनी नागपंचमी उत्सव साजरा करावा. उत्सव साजरा करताना कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नागपंचमी उत्सवानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक एम. बी. डुबुले, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एन. एम. मोहिते, शिराळा नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, वाळवा प्रांताधिकारी नागेश पाटील, शिराळा तहसिलदार गणेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यंत्रणांना जिवंत नागांची पूजा होणार नाही यासाठी चोख नियंत्रण ठेवावे, असे सांगून नाग पकडताना, जिवंत नागाची पूजा करताना, नागांच्या स्पर्धा भरवताना आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावेत असे सांगून उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
वन विभागाने गस्ती पथकांची संख्या वाढवून परिणामकारकपणे अंमलबजावणी करावी. उत्सव काळात व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून चित्रीकरण करावे, आवश्यक तिथे सीसीटिव्ही लावावेत. आरोग्य विभागाने या काळात आवश्यक प्रतिबंधक लस उपलब्ध ठेवाव्यात. एनजीओनी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. कोठेही अनुचित प्रकार होत असल्यास तात्काळ पोलिस, वन विभाग आदि यंत्रणांशी संपर्क साधावा. उत्सव कायद्याच्या नियमांचे काटेकोर पालन करित शांततेत पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
नागपंचमी सणानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच ध्वनीक्षेपणाची मर्यादा ओलांडू नये. कायद्याचे उल्लंघन न करता हा उत्सव साजरा करावा. याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच, यासाठी वनविभाग, आरोग्य विभाग, नगरपंचायत, अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी आगार, अंबामाता मंदिर ट्रस्ट, महावितरण आदी विभागांनी आपत्ती घडू नये यासाठी खबरदारी व पूर्व काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.