मातीच्या नागपूजनाने शिराळ्यात नागपंचमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:20 AM2018-08-16T05:20:36+5:302018-08-16T05:21:01+5:30
अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात आणि पावसाच्या सरींच्या हजेरीत शिराळ्यामध्ये नागपंचमी उत्सवास सुरुवात झाली. महिलांनी नागाच्या प्रतिमेचे, मातीच्या नागांचे पूजन करून उपवास सोडला.
शिराळा (जि. सांगली) - ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात आणि पावसाच्या सरींच्या हजेरीत शिराळ्यामध्ये नागपंचमी उत्सवास सुरुवात झाली. महिलांनी नागाच्या प्रतिमेचे, मातीच्या नागांचे पूजन करून उपवास सोडला. राज्य-परराज्यातून आलेल्या भाविकांना जिवंत नागांचे दर्शन न झाल्याने नाराजी दिसून येत होती. गेल्या काही वर्षांपासून न्यायालयाच्या आदेशानुसार, जिवंत नाग पकडण्यास आणि त्यांच्या पूजेस बंदी घालण्यात आली आहे.
शिराळा व नाग यांचे नाते अतूट आहे. नागपंचमीमुळे देशातच नव्हे, तर परदेशातही शिराळा शहराची ओळख निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी सहापासून अंबामाता मंदिरात भाविक, नागमंडळांच्या पदाधिकारी, सदस्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नागमंडळे वाजतगाजत नागाची प्रतिमा घेऊन मंदिरात येत होते. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने संपूर्ण शिराळा दुमदुमून गेले होते.
दुपारी १२च्या दरम्यान महाजन यांच्या घरामध्ये मानाच्या पालखीचे पूजन मानकऱ्यांनी केले. त्यानंतर, पालखी उचलण्यात आली. ती उचलण्याचा मान भोई समाजाकडे असतो. नागाचा मान कोतवालांकडे आहे. पालखी आणि मातीच्या नागाची पूजा करून ही पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी आल्यावर मिरवणुकीस सुरुवात झाली.
मंदिर परिसर गजबजला
ही मिरवणूक होळीचा टेक, गुरुवार पेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, मेन रोड आदी मार्गांवरून अंबामाता मंदिराजवळ आल्यावर तिची सांगता झाली. अंबामाता मंदिर परिसर व नाग स्टेडियम परिसर पूजेचे साहित्य, खेळणी, खाद्यपदार्थ आदी विक्रेत्यांनी गजबजलेला होता.