नाईक, खाडेंना मंत्रिपद शक्य
By admin | Published: December 4, 2014 12:43 AM2014-12-04T00:43:08+5:302014-12-04T00:45:04+5:30
राजकीय घडामोडींना वेग : सदाभाऊ खोत यांच्या संधीची शक्यता धूसर
अशोक पाटील / इस्लामपूर
महाराष्ट्राच्या विस्तारित मंत्रिपदाचा शपथविधी शुक्रवारी (दि. ५) निश्चित झाल्याने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सांगली जिल्ह्यात मंत्रिपदाची लॉटरी कोणाला लागेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांना कोअर कमिटीने आमंत्रित केले असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना कोणताही निरोप न आल्याने त्यांच्या मंत्रिपदाची शक्यता आता धूसर झाली आहे. आ. सुरेश खाडे यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.
महायुतीत बिघाडी झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपबरोबर युती केली होती. याच ताकदीवर सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद द्यावे, असा आग्रह स्वत: खासदार राजू शेट्टी यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपुढे धरला होता. त्यामुळेच खोत यांनी जयसिंगपूर येथील शेतकरी मेळाव्यात मंत्रिपद मिळणारच, अशी घोषणा केली होती. परंतु, विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी दोन दिवसांवर येऊन ठेपला तरीही त्यांना भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी काहीच कळविले नसल्याचे समजते. याबाबत खोत यांच्याशी संपर्क साधला असता, मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अद्याप काहीही कळवले नसल्याचे त्यांनी सांगितले. खासदार राजू शेट्टी आज, बुधवारी राज्यसभेत होते. त्यामुळे त्यांनी या विषयावर नंतर बोलू, असे सांगितले. या दोन नेत्यांच्या भूमिकेवरून सध्या तरी सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळणे धूसर झाल्याचे दिसत आहे.
आ. नाईक यांनी आपला मुंबईतील मुक्काम वाढवला असून, त्यांना कोअर कमिटीच्या नेत्यांनी आमंत्रित केल्याचे समजते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आघाडी काँग्रेसच्या काळात सांगली जिल्ह्याला तीन मंत्रिपदे होती. हे तिघेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. आर. आर. पाटील वगळता पतंगराव कदम, जयंत पाटील यांच्याकडे सहकारी आणि शिक्षण संस्थांची ताकद आहे. याच ताकदीला आव्हान देण्यासाठी भाजपकडून सांगली जिल्ह्याला दोन मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्येष्ठतेनुसार सुरेश खाडे आणि अनुभवी म्हणून शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदाची संधी देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना शह देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.