नागेवाडीत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या हजेरीने चर्चेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:13 PM2017-10-01T23:13:45+5:302017-10-01T23:13:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : लोकनेते संपतरावनाना माने यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला खासदार संजयकाका पाटील, विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख व राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक अशा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दुष्काळी नागेवाडी येथे माजी आमदार संपतरावनाना माने यांनी यशवंत साखर कारखान्याची उभारणी केली. त्यांच्या निधनानंतर कारखाना कार्यस्थळावर माने यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. काही वर्षे याठिकाणी संपतनानांची जयंती, पुण्यतिथी आदी कार्यक्रम पार पडले. परंतु, कालांतराने त्यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले. याची खंत दुष्काळी तालुकावासीयांच्या मनात सतत राहिली. खानापूर तालुक्याच्या जडणघडणीत संपतराव माने यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या यशवंत कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्वच्छता करून त्यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांना अभिवादन करण्याचा निर्णय राजकीय नेत्यांनी घेतला.
रविवारी सकाळी कारखाना कार्यस्थळावर खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, संग्राम माने, राजू जानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर आदी दिग्गज राजकीय नेत्यांनी माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संपतनानांच्या पश्चात आमदार अनिल बाबर यांनी यशवंत कारखान्याची धुरा सांभाळली. त्यानंतर हा कारखाना खासदार संजयकाकांच्या गणपती जिल्हा संघाने लिलावात खरेदी केला. रविवारी आमदार बाबर यांच्या विरोधकांनी पहिल्यांदाच कारखाना कार्यस्थळावर एकत्रित जाऊन संपतनानांच्या पुण्यतिथीदिनी अभिवादन केल्याने तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.