महापालिका क्षेत्रातील नालेसफाई जूनपूर्वी पूर्ण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:20+5:302021-05-19T04:28:20+5:30
सांगली : महापालिकेकडून शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या १ जूनपूर्वी सर्वच नाल्यांची स्वच्छता पूर्ण केली ...
सांगली : महापालिकेकडून शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या १ जूनपूर्वी सर्वच नाल्यांची स्वच्छता पूर्ण केली जाईल, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
महापालिका क्षेत्रात ५० हून अधिक छोटे-मोठे नाले आहेत. २०१९ च्या पुरावेळी नाल्यांची सफाई वेळेत न झाल्याने शहरात पाणी शिरले होते. त्यामुळे गतवर्षी आयुक्तांनी सव्वा कोटी रुपये खर्च करून नालेसफाई केली. यावेळी केवळ नाल्यातील गाळच काढला नाही तर सर्वच नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. यंदा मे महिन्यापासून नालेसफाईचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. नाल्याच्या मार्गातील अडथळे दूर करून सफाई सुरू आहे. हे सर्व नाले १ जूनपूर्वी गाळमुक्त होतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
चौकट
नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करावी
नाल्याच्या आजूबाजूच्या बफर झोनमध्ये काही मालमत्ता आणि बांधकामे आहेत, तसेच ज्या मालमत्ता आणि बांधकामे पुरामुळे बाधित होत आहेत अशा सर्वांना महापालिका प्रशासनाकडून पुढील आठवड्यापासून पर्यायी जागा शोधण्याबाबत सूचित केले जाणार आहे, असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.