नालसाब मुल्ला खूनप्रकरण: गोळीबारासाठी मध्य प्रदेश बनावटीचे पिस्तूल, संशयितांना पाच दिवस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 04:15 PM2023-06-20T16:15:12+5:302023-06-20T16:15:33+5:30
रात्रीच्या सुमारास घरासमोर थांबला असता नालसाब मुल्लावर गोळ्या झाडल्या
सांगली : राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मौलाअली मुल्ला (रा.गुलाब कॉलनी, सांगली) याच्या खुनातील पिस्तूल, कोयता व दोन दुचाकी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केली. मध्य प्रदेश बनावटीच्या पिस्तुलाचा गोळीबारासाठी वापर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांना पाच दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
सनी सुनील कुरणे (वय २३, रा.जयसिंगपूर), विशाल सुरेश कोळपे (२०, रा.लिंबेवाडी ता.कवठेमहांकाळ), स्वप्निल संतोष मलमे (२०, रा.खरसिंग, ता.कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
शहरातील शंभरफुटी रोडवरील माने चौकापासून जवळच गुलाब कॉलनीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याचा बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचा बाबा सप्लायर्स नावाने व्यवसाय आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास तो आपल्या घरासमोर थांबला होता. यावेळी कुरणे, मलमे व कोळपे तिथे आले. दोघांनी बंदुकीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, तर एकाने कोयत्याने वार केला. यातील अल्पवयीन मुलगा घटनास्थळापासून थोड्या अंतरावर दुचाकी सुरू करून उभा असल्याचे तपासात समोर आले आहे.
२०१९ मध्ये महेश नाईक याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित सचिन डोंगरे याचा जामीन होऊ नये, यासाठी नालसाब प्रयत्न करत होता. त्याच्यामुळेच डोंगरेला जामीन मिळत नाही, याचा राग मनात धरूनच खून केल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, एलसीबीच्या पथकाने संशयितांकडून दोन पिस्तूल, दुचाकी, कोयता जप्त केला आहे. संशयितांनी हल्ल्यासाठी मध्य प्रदेशमध्ये तयार केलेले पिस्तूल वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयितांनी पिस्तूल कोठून आणले, याचा तपास सुरू आहे. संशयित तिघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
सचिन डोंगरेला ताब्यात घेणार
महेश नाईक खुनातील मुख्य संशयित सचिन डोंगरे सध्या कारागृहात आहे. त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नालसाब मुल्लाच्या खुनातही त्याचा सहभाग स्पष्ट झाल्याने, त्याला कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.