नलवडे कॉलनी चोरी प्रकरण; तीन आरोपींना मध्यप्रदेशातून मुद्देमालासह अटक, शिराळा पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 12:40 AM2022-06-21T00:40:35+5:302022-06-21T00:54:03+5:30

या संशयितांचे दि.२० एप्रिल रोजी जालना, बीड, अंबेजोगाई, पैठण  या परिसरात वास्तव होते त्यादरम्यान या परिसरात घरफोड्या झाल्या आहेत.

Nalwade Colony theft case Three accused arrested from Madhya Pradesh, Shirala police action | नलवडे कॉलनी चोरी प्रकरण; तीन आरोपींना मध्यप्रदेशातून मुद्देमालासह अटक, शिराळा पोलिसांची कारवाई

फोटो -विकास शहा

Next

सांगली/शिराळा - नलवडे कॉलनीमध्ये झालेल्या चोरीतील पाच संशयितांपैकी तिन जणांना मध्यप्रदेशातील टांडा ( जि. धार) येथून मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. शिराळा पोलिसांनी एस टीचे तिकीट आणि मोबाईल लोकेशनचा वापर करत या संशयितांना अटक केली.

रमेश केशरसिंह मेहडा (वय ३२ ), महेंद्र केशरसिंह मेहडा (वय २९ ) (दोघेही राहणार भुरीयापुरा पी. भुतिया, ता गंधवानी) आणि मनोज जुवानसिंह वास्केल( वय २४ रा . मुहाजा ता . कुक्षी जि . धार),  अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर समरसिंह रतनसिंह भुरीया आणि अर्जुन ऊर्फ भुरू वसुनिया (दोघेही रा. भुतिया ता. गंधवानी जि. धार मध्यप्रदेश) अशी फरारी संशयित आरोपींची नावे आहेत. या टोळी कडून देशातील विविध राज्यातील चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

येथील नलवडे कॉलनी येथील ४ जून रोजी वनिता पोवार यांच्या घरातून १० तोळे सोने, स्टेट बँक ऑफ इंडिया सेवा केंद्र येथील ५५ हजार रुपये रोख तसेच अमन इम्तियाज मुल्ला यांची (एम एच१० डी के ५५२०) व शैलेश गायकवाड याची ( एम एच १० यु ८०६७ ) मोटारसायकल चोरीस गेली होती.

पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेली एस टी बसेसची तिकिटे, शिराळा, पेठ आणि इस्लामपूर येथील सिसिटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यावरून मनोज वास्केल यास टांडा येथे सापळा रचून अटक केली. त्याच्या माहितीवरून रमेश  मेहडा,  महेन्द्र मेहडा या दोघांना भूतीयापुरा येथे अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने, मोबाईल व पंधराशे पन्नास  रुपये रोख रक्कम हस्तगत केली. यावेळी इतर दोघे संशयित फरारी झाले. तसेच कराड व कासेगाव जवळ संशयितांनी सोडलेल्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या. 

हा तपास पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश  चिल्लावार, पोलीस उपनिरीक्षक, अविनाश  वाडेकर,कालीदास गावडे,  संदीप पाटील,  नितीन यादव,  अमर जाधव , प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, टांडापोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय बास्केल, भानुप्रतापसिंह राजपुत यांनी ही कारवाई केली.

१) नलवडे कॉलनी जवळील सचिन उबाळे हे अमेरिकेत असतात त्यांना त्यांचा घराबाहेर बसवलेला सिसिटीव्ही हलवल्याचा मेसेज आला त्यावेळी त्यांनी रात्रीच अमेरिकेतून कॉल करून शिराळा पोलिसांना कल्पना दिली. तातडीने पोलीस त्या ठिकाणी गेले असता पोलिसांना पाहून एकमेकांना मोबाईल वरून फोन केले. यामुळे या संशयितांचे मोबाईल क्रमांक सायबर क्राईम कडून मिळाले. त्यामुळे तपासाला वेग आला. 
२) हे संशयित हिरुगडे ते कागवड, कागवड ते मिरज, मिरज , इस्लामपूर असा प्रवास करून शिराळ्यात आले.
२) या संशयितांचे दि.२० एप्रिल रोजी जालना, बीड, अंबेजोगाई, पैठण  या परिसरात वास्तव होते त्यादरम्यान या परिसरात घरफोड्या झाल्या आहेत.
३) शिराळा पोलिसांनी दोन हजार किलोमीटर प्रवास करत संशयितांना जीव धोक्यात घालून अटक केली.
४) उपविभागीय पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी, दोन फरारी संशयितांना मुद्देमालासह लवकरच अटक करू तसेच ज्यांनी या टोळीस पकडले त्यांना जास्तीत जास्त रक्कम बक्षीस देण्याची शिफारस करू, असे पत्रकार परिषदेत सांगितले.
५) टांडा हा सर्वात धोकादायक भाग आहे येथे खून , दरोडे ,मारामारी आदी प्रकरणांतील गुन्हेगार आहेत.जवळपास दोन हजार पेक्षा जास्त वॉरंट शिल्लक आहेत. या गुन्ह्यातील संशयितांच्या नातेवाईकानी तांडा पोलीस ठाण्यावर गतवर्षी हल्ला व गोळीबार केला होता.
 

Web Title: Nalwade Colony theft case Three accused arrested from Madhya Pradesh, Shirala police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.