कृषी कार्यालय नावाला, कारभार सगळा तालुक्याला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:35+5:302020-12-30T04:35:35+5:30
माडग्याळ : ‘माडग्याळ मंडल कृषी कार्यालय नावाला, कारभार सगळा तालुक्याला’ अशी अवस्था येथील मंडल कार्यालयाची झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ...
माडग्याळ : ‘माडग्याळ मंडल कृषी कार्यालय नावाला, कारभार सगळा तालुक्याला’ अशी अवस्था येथील मंडल कार्यालयाची झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील कृषी मंडल कार्यालय कुलूपबंद अवस्थेत असून, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयाअंतर्गत ३३ गावे येतात. या सर्व गावांचा कारभार माडग्याळमधून न करता तालुक्याच्या ठिकाणी सुरू आहे. मंडल अधिकारी माडग्याळला महिन्यातूनही कधी कार्यालयाकडे येत नाहीत. हे बंद कार्यालय कधी उघडले जाते, याचा पत्ता कुणालाच लागत नाही. या ठिकाणी एक मंडल अधिकारी, दोन पर्यवेक्षक, चार कृषी सहायक अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. मात्र कृषी सहायक शेतीविषयी विविध माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना अनेक येाजनांची माहिती मिळत नाही. शासनाने राबविलेल्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल शकत नसल्याने गोरगरीब शेतकरी शासन याेजनांपासून वंचित रहात आहेत. या भागातील सर्वच शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाणे-येणे परवडणारे नाही. गेले तरी तेथेही अधिकारी व कर्मचारी भेटतीलच, याची खात्री नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जातो. मंडल कार्यालय बंद असल्यामुळे माडग्याळसह, येळवी, घोलेश्वर, काराजनगी, सनमडी, मायथळ, कोळगेरी, व्हसपेट, गुड्डापूर, सोन्याळ, लकडेवाडी, टोणेवाडी, कुणीकोणूर, आबाचीवाडी, वळसंग, बडची, सोर्डी, लमाणतांडा सह ३३ गावांतील शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित विविध याेजनांची माहिती घेण्यासाठी माडग्याळऐवजी जतला जाणे भाग पडते. माडग्याळमधील कार्यालय नियमित सुरू केल्यास शेतकऱ्यांना सोयीचे हेणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकामी लक्ष घालून येथील कार्यालय नियमित सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून हाेत आहे.