व्यापारी संकुलास शिवाजी महाराजांचे नाव
By Admin | Published: February 10, 2016 01:04 AM2016-02-10T01:04:35+5:302016-02-10T01:08:41+5:30
तासगाव नगरपरिषद सभा : विरोधकांचा विरोध नोंदवून संकुलाचे नामकरण
तासगाव : व्यापारी संकुलाच्या नामांतराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. मात्र पालिकेत सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असल्याने नाईलाजास्तव विरोधकांनी नरमाईची भूमिका घेतली. त्यामुळे बसस्थानक चौकातील व्यापारी संकुल आणि भाजीपाला मार्केटला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव सर्वमताने मंजूर झाला.
नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. सभेत विषय पत्रिकेवर श्री शिवप्रतिष्ठान हिंंदुस्थान शाखा तासगाव आणि विश्वहिंदू परिषद बजरंग दल शाखा तासगाव यांच्या अर्जावर विचारविनिमय करुन निर्णय घेण्याचा ठराव चर्चेस आला. या विषयाबाबत नेमका उल्लेख केला नसल्याने विरोधी राष्ट्रवादी, काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला. व्यापारी संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी हिंंदुत्ववादी संघटनांनी केली होती. परंतु या व्यापारी संकुलास ११ जानेवारी २०११ च्या सभेत आर. आर. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला होता. नव्याने होणाऱ्या संकुलाला शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी नगरसेवक अजय पाटील, अमोल शिंदे, अजय पवार यांनी केली. आर. आर. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. त्यावेळच्या विद्यमान सभागृहातील अजय पाटील, अमोल शिंंदे, जाफर मुजावर, बाबासाहेब पाटील, रजनीगंधा लंगडे, सुशिला साळुंखे नगरसेवक होते. तरीही हे नाव बदलण्याचा निर्णय कशासाठी घेतला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला. नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनीही पूर्वीचे नाव बदलण्याऐवजी नवीन संकुलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली. सामाजिक संघटनांच्या अर्जाचा राजकीय अर्थ काढू नये, अशी मागणी नगरसेवक अविनाश पाटील यांनी केली. (वार्ताहर)
व्यापारी संकुलासाठी पालिकेचाच निधी
व्यापारी संकुलासाठी कोणत्याही नेत्याने विशेष निधी मंजूर केलेला नाही. नगरपालिकेच्या निधीतूनच व्यापारी संकुलाचे काम झालेले आहे. या संकुलास शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा विषय हा लोकांच्या भावनेशी निगडित आहे. त्यामुळे त्याचे राजकारण करु नये, अशी सूचना नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. विरोधी नगरसेवकांनी नामकरणाचा विषय ताणून धरल्यामुळे, नगराध्यक्ष पाटील यांनी शेवटी हा विषय मताला टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अल्पमत असल्याने नरमाईची भूमिका घेतली. अखेर सर्वानुमताने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला. याचवेळी नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या १२ क्रमांकाच्या शाळेच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या शॉपिंंग सेंटरला डी. एम. पाटील यांचे नाव देण्याचा ठरावही घेण्यात आला.
नामांतर की नामकरण?
नगरसेवक अजय पाटील यांनी विषयपत्रिकेवर नामकरणाबाबत नेमका उल्लेख केला नसल्याने नाराजी व्यक्त केली. व्यापारी संकुलाला दिलेले पूर्वीचे नाव बदलून नामांतराचा ठराव घेतला जाणार आहे, की नव्याने नामकरण करण्यात येणार आहे, असा प्रश्न उपस्थित करुन, याबाबत घेतलेल्या पूर्वीच्या ठरावाचा उल्लेख कोठेच नमूद केला नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.