गावपातळीवरील कोरोना दक्षता समित्या नामधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:42+5:302021-04-15T04:26:42+5:30
कडेगाव : मास्कचा वापर करणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे याबाबत जनजागृती करूनही कडेगाव तालुक्यातील कित्येक नागरिक ...
कडेगाव : मास्कचा वापर करणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे याबाबत जनजागृती करूनही कडेगाव तालुक्यातील कित्येक नागरिक जागरूक झालेले नाहीत. आपल्या गावात कोणते रुग्ण पॉझिटिव्ह आहेत; याची बहुतांशी गावांमधील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि दक्षता कमिटीला माहिती नसते. काही होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर फिरत असतात. हे रुग्ण कोरोनाचा प्रसार वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.
वास्तविक कोरोना दक्षता समितीने लक्ष दिले तर होम क्वारंटाईन रुग्ण घराबाहेर पडण्याचे धाडस करणार नाहीत. कडेगाव तालुक्यात बुधवारी ८६ रुग्ण आढळले आहेत, तर सद्या ३४५ रुग्ण उपचाराखाली आहेत. होम क्वारंटाईन केलेले रुग्ण १४ ते १७ दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात येऊ नयेत अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. मात्र, मला काही लक्षणे नाहीत, मी आता बरा आहे, मला काहीच त्रास नाही, अशी कारणे सांगत काही रुग्ण घराबाहेर पडून कोरोनाचा प्रसार वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.
यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे झाले आहे. मात्र, यासाठी कोरोना दक्षता समित्या कार्यरत होणे गरजेचे आहे.
तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या व उपलब्ध सुविधा पाहता प्रशासनाची दमछाक होत आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा एकटीच आघाडीवर लढत असल्याचे चित्र असून, अन्य विभागांची याबाबतची उदासीनता चिंतेचा विषय आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. ग्रामदक्षता समितीने तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
चौकट :
ते झटकतात जबाबदारी
बहुतांश तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे शहरात राहून आपल्या नेमणुकीच्या गावी ये-जा करतात. नियमित ते मुख्यालयी हजर नसतात. सध्याची स्थिती पाहता सर्व पथकाने गावात हजर राहणे गरजेचे असताना कर्मचारी जबाबदारी झटकताना दिसत आहेत.