महापौरपदासाठी बंद लिफाफ्यातून येणार नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:33+5:302021-02-15T04:24:33+5:30

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी बंद लिफाफ्यातून उमेदवारांची नावे दिली जाणार आहे. उमेदवार निवडीचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ...

Names for the post of Mayor will come in a sealed envelope | महापौरपदासाठी बंद लिफाफ्यातून येणार नावे

महापौरपदासाठी बंद लिफाफ्यातून येणार नावे

Next

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी बंद लिफाफ्यातून उमेदवारांची नावे दिली जाणार आहे. उमेदवार निवडीचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षांचा कौल कुणाला मिळतो याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान. रविवारी पाटील यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेत त्यांची मते अजमाविली. पुढचा महापौर भाजपचाच होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक आणि कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर गीता सुतार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, गटनेते विनायक सिंहासने, नीता केळकर, माजी महापौर संगीता खोत, आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, १०० कोटींच्या निधीतून तसेच आमदार निधीतून प्रभागात कोणती कामे झाली, याची यादी करा. गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामाचा अहवाल करा आणि तो लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक नगरसेवकाचे संपर्क कार्यालय झाले पाहिजे. तुमच्या कामाची नोंद घेतली जाईल. प्रत्येकाला संधी दिली मिळेल. राज्यात सत्ता नसली तरी जनता आपल्यासोबत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. पुढचा काळ आपलाच आहे.

यावेळी महापौरपदासाठी इच्छुक असलेले धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, अजिंक्‍य पाटील, स्वाती शिंदे आणि निरंजन आवटी यांनी एकत्रितपणे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. पक्ष ज्याला संधी देईल त्याच्यासोबत राहू. आमच्यापैकी कुणालाही संधी द्या, असे या सर्वांनी सांगितले. यावर चंद्रकांत पाटील यांनी पहिला, दुसरा, तिसरा कुणाला संधी द्यायची, हे तुम्हीच ठरवून द्या, अशी फिरकी इच्छुकांसमोर टाकली. मात्र सर्वांनी पाटील यांनाच निर्णय घेऊन सांगा; आम्हाला मान्य होईल, असा विश्‍वास दिला.

त्यामुळे आता महापौर, उपमहापौर निवडीचे नाव प्रदेशाध्यक्षांकडून येणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी म्हणजे १८ रोजी बंद लिफाफ्यातून नावे दिली जातील. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Names for the post of Mayor will come in a sealed envelope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.