पलूस येथील नायब तहसीलदार निलंबित, हलगर्जीपणाचा ठपका : प्रांतांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:40 PM2018-05-12T13:40:29+5:302018-05-12T13:40:29+5:30
पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूसचे महसूल नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी निलंबित केले.
कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पलूसचे महसूल नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी निलंबित केले.
कडेगाव-पलूस मतदारसंघातील निवडणूक कामासाठी पलूसचे महसूल नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. तसा आदेश मोरे यांना २ मे रोजी देण्यात आला होता. हा आदेश सोशल मीडियामार्फतही देण्यात आला होता, तसेच ४ मे रोजी दूरध्वनीवरून मोरे यांना सूचनाही केल्या होत्या. तरीसुद्धा मोरे यांनी कोणतेही काम केलेले नाही.
या कामासाठी ते कार्यालयात हजरही राहिले नाहीत. गुरूवारी तहसीलदारांनी मोरे यांना फोन केला असता, त्यांनी फोनही उचलला नाही. ५ मे पासून ते अनधिकृतपणे गैरहजर आहेत.
यावरून एन. बी. मोरे यांनी निवडणुकीसारख्या संवेदनशील कामात दुर्लक्ष, हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याचा आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी महसूल नायब तहसीलदार एन. बी. मोरे यांना १० मे पासून शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.