सांगलीतील मांगरुळच्या नम्रता मस्केचा स्पर्धा परीक्षेत डबल धमाका; एमपीएससीत यश, युपीएससीत 'क्लास वन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:08 PM2024-01-20T18:08:48+5:302024-01-20T18:09:41+5:30
वडिलांनी शेतीच्या उत्पन्नावरच दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले
विकास शहा
शिराळा : मांगरूळ (ता. शिराळा) येथील नम्रता मस्के हिने वडिलांच्या पाठबळावर क्लास वन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती राज्यात २८ व्या क्रमांकाने यशस्वी झाली. मागील वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती राज्यात पहिली आली होती, तर मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणून आठव्या क्रमांकाने यशस्वी ठरली होती. एकाच वेळी दोन्ही परीक्षांत अव्वल येणारी ती पहिलीच मुलगी होती.
विक्रीकर अधिकारी हे पद हाताशी असतानाच प्रथम वर्ग अधिकारीपदासाठी तिची स्पर्धा परीक्षेची जोरदार तयारी सुरू होती. गेल्यावर्षी तिने जिद्द व मेहनतीच्या जोरावर विक्रीकर अधीक्षक व मंत्रालयात कक्ष अधिकारी पद मिळविले होते. मात्र, यावरच समाधान न मानता तिने पुढची तयारी सुरू होती. वडील ज्ञानदेव मस्के शेतकरी आहेत. त्यांच्या पाठबळावर तिने यशाच्या मार्गावर झेप घेतली.
तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मांगरूळ येथे झाले. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही शिक्षणाच्या आड येऊ दिली नाही. नम्रताला श्रद्धा नावाची जुळी बहीण आहे. वडिलांनी शेतीच्या उत्पन्नावरच दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण केले.
सरकारी नोकरी यापूर्वीच मिळालेली असली, तरी क्लास वन अधिकारीपद खुणावत होते. कसून अभ्यास आणि आई-वडिलांच्या पाठबळावर यशाचा हा पल्ला गाठता आला. - नम्रता मस्के