नांदेड-हुबळी विशेष रेल्वे मिरजमार्गे सुरू, प्रायोगिक तत्त्वावर एक्स्प्रेस धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 02:30 PM2022-07-15T14:30:25+5:302022-07-15T14:31:18+5:30
विशेष एक्स्प्रेस पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड या स्थानकात थांबणार आहे
मिरज : नांदेड ते हुबळी दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. विशेष रेल्वेच्या मिरजमार्गे प्रत्येकी तीन फेऱ्या होणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही रेल्वे गाडी नियमित सुरू होणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे नांदेड ते हुबळी दरम्यान शनिवार १६ पासून विशेष रेल्वे धावणार आहे. नांदेड-हुबळी विशेष रेल्वे १६, २३ व ३० रोजी धावेल. नांदेड येथून दुपारी २.१४ वाजता सुटेल. मिरजेत मध्यरात्री २.१५ वाजता व हुबळी येथे सकाळी ९ वाजता पोहोचेल. हुबळीतून ही गाडी १७, २४ व ३१ रोजी सकाळी ११.१५ वाजता सुटेल. मिरजेत सायंकाळी ६.३० वाजता व दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१० वाजता नांदेड स्थानकात पोहोचेल.
विशेष एक्स्प्रेस पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड या स्थानकात थांबणार आहे. मिरजेतून मराठवाड्यात जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीच्या असलेल्या या विशेष गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास ही रेल्वे नियमित सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.