नांद्रेत ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:29+5:302021-07-31T04:27:29+5:30
सांगली : महापुरामध्ये भिलवडी, नांद्रे व बोरगाव (ता. वाळवा) या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पाणी शिरले होते. आमणापूर व कसबे ...
सांगली : महापुरामध्ये भिलवडी, नांद्रे व बोरगाव (ता. वाळवा) या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पाणी शिरले होते. आमणापूर व कसबे डिग्रज येथील आयुर्वेदिक रुग्णालये तसेच २२ उपकेंद्र जलमय झाली होती. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत ही माहिती देण्यात आली. यावेळी नांद्रेत ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे ठरले.
सभापती आशा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. त्यांनी सांगितले की, पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य शिबिरे सुरु आहेत. त्वचाविकार, किरकोळ आजार, जखमा, लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांवर उपचार करण्यात येत आहेत. आजवर १,०९८ रुग्णांवर उपचार झाले. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम सुरु राहील. आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेत आहेत. या रुग्णांवर मोफत उपचार होतील. दुधगाव व माधवनगर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या जुन्या धोकादायक इमारतींच्या निर्लेखनाला मंजुरी देण्यात आली. संतोषवाडी, माधवनगर (ता. मिरज), मापटेमळा (ता. आटपाडी) येथील उपकेंद्र, वसगडेमधील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या अंदाजपत्रकांनाही मंजुरी देण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत निजाम मुलाणी, मारुती शिंदे, सरिता कोरबू, आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, क्षयरोग अधिकारी डॉ. एस. ए. जोशी, हिवताप अधिकारी शुभांगी अधटराव आदींनी भाग घेतला.