Sangli: भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर नांगोळे ग्रामपंचायत प्रथम
By अशोक डोंबाळे | Published: January 27, 2024 01:40 PM2024-01-27T13:40:04+5:302024-01-27T13:40:24+5:30
सांगली : अटल भूजल योजनेंतर्गत घेतलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील ...
सांगली : अटल भूजल योजनेंतर्गत घेतलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे ग्रामपंचायतीस प्रथम, बोरगाव ग्रामपंचायतीस द्वितीय तर तासगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांक मिळाला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख अशी बक्षिसाची रक्कम आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे यांनी दिली.
गावांमध्ये सुदृढ स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन साध्य होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील योजनेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या १२ जिल्ह्यांतील २७० ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. एकूण ५५० गुणांसाठी स्पर्धा झाली. स्पर्धेचे मूल्यांकन उपविभाग स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीन स्तरांवर केले. जिल्हास्तरीय स्पर्धेत नांगोळे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे ५० लाख रुपयांचे बक्षीस पटकाविले असून द्वितीय बोरगाव ग्रामपंचायतीस द्वितीय क्रमांकाचे ३० लाख आणि वडगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचे २० लाख रुपयांचे बक्षीस मिळविले आहे.