नंग्या तलवारींसह तरुणांचा धुमाकूळ

By admin | Published: August 7, 2016 11:09 PM2016-08-07T23:09:32+5:302016-08-07T23:09:32+5:30

सांगलीत घटना : दोन वाहनांची तोडफोड; खणभागामध्ये तणाव

Nangya swords and youths | नंग्या तलवारींसह तरुणांचा धुमाकूळ

नंग्या तलवारींसह तरुणांचा धुमाकूळ

Next

सांगली : येथील खणभागात भरदिवसा तरुणांच्या टोळक्यांनी नंग्या तलवारी घेऊन धुमाकूळ घातला. एकाच्या हातात रिव्हॉल्व्हरही होते. टोळक्याने दोन वाहनांची मोडतोड केली. दगडफेकही झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडूनही शहर पोलिसांत याची रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.
टिंबर एरिया परिसरातील सात ते आठजणांचे टोळके दुचाकीवरून खणभागात आले होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या. एकाच्या हातात रिव्हॉल्व्हर होते. नंग्या तलवारी नाचवित त्यांनी आरडाओरड केली. गल्ली-बोळात जाऊन धुडगूस घातला. दोन तरुणांच्या शोधासाठी ते आले होते. यातील एक तरुण त्यांना सापडला. त्यांनी त्याला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तेवढ्यात आणखी एका तरुणास पकडून त्यांनी मारहाण केली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. खणभागातील लोक जमू लागल्यानंतर टोळक्याने अधिकच दंगा सुरू केला. रस्त्याकडेला लावलेल्या दोन वाहनांची दगडफेक करुन मोडतोड केली. एक वाहन तर रस्त्यावर पाडून त्यावर दगड घालण्यात आला. ज्या तरुणांना ते मारहाण करीत होते, ते त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी आरडाओरड करीत होते. तेवढ्यात त्यांचे नातेवाईकही सर्व तयारीने आले. दोन्ही गट आमने-सामने भिडले. पण खणभागातील जमाव वाढू लागल्याने तरुणांच्या टोळक्याने तेथून पलायन केले.
हल्ल्यात जखमीपैकी एकजण उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. त्याने सुरुवातीला दुचाकीवरून पडून जखमी झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पत्रा लागून जखमी झाल्याचे सांगितले. जखमी तरुण खणभागातील आहे. त्याच्या समर्थकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस मोटारीने रुग्णालयात दाखल झाले; पण त्यांनी जखमी तरुणाकडे फारशी चौकशी केली नाही. काही वेळानंतर ते निघून गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत जखमी व त्याचे समर्थक रुग्णालयातच होते. शहर पोलिसांनी खणभागात जाऊन पाहणी केली.
मोडतोड झालेली वाहने ताब्यात घेतली आहेत. ती कुणाची आहेत, याचा उलगडा झालेला नाही. रात्री उशिरापर्यंत खणभागात तणाव होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गुन्हा नोंद नाही
शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नव्हता. भरदिवसा घटना घडूनही शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नव्हते. त्यामुळे हा प्रकार कशातून घडला, जखमी कोण आहेत? हल्लेखोर कोण होते? त्यांच्याकडून हत्यारे कोठून आली? याचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही. याबाबत शहर पोलिसांकडे चौकशी केली असता, त्यांनी घटना घडली आहे, परंतु तक्रार देण्यासाठी कोणी फिरकले नाही, असे सांगितले.
 

Web Title: Nangya swords and youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.