संख नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव रखडला
By admin | Published: November 6, 2014 10:28 PM2014-11-06T22:28:19+5:302014-11-06T23:01:56+5:30
मंजुरीची केवळ घोषणाच : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, राजकीय पाठबळाचा अभाव
गजानन पाटील-दरीबडची -लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, राजकीय पाठबळाचा अभाव यामुळे जत तालुक्यातील संख येथील नवीन पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव २००२ मध्ये मंजूर होऊन १२ वर्षे लालफितीत अडकला आहे. मानवी संरक्षण आणि मालमत्तेचे रक्षण यादृष्टीने संखला स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. जिल्हा पोलीसप्रमुख व कोल्हापूर परिमंडलच्या अधिकाऱ्यांनी गेल्याचवर्षी संखला पोलीस ठाणे मंजुरीची घोषणा केली होती.
तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी गरजेच्या ठिकाणी एका वर्षात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती केली जाणार, अशी घोषणा केली होती. ती हवेतच विरली आहे. महायुतीच्या शासनाकडून त्वरित पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात विस्ताराने सर्वात मोठा असणारा जत तालुका गुन्हेगारीमध्येही चर्चेत असतो. तालुक्यामध्ये ११७ गावे आहेत. तालुक्याच्या ठिकाणापसून अनेक गावे ६० ते ६५ कि. मी. अंतरावर आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी जत व उमदी ही दोन पोलीस ठाणी पूर्वीपासून कार्यरत आहेत. जत पोलीस ठाण्यात ७२ गावांचा व उमदी पोलीस ठाण्यामध्ये ४५ गावांचा समावेश आहे.
उमदी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र कर्नाटक सीमेलगत आहे. कर्नाटकातील विजापूर व इंडी तालुक्याच्या सीमा लागलेल्या आहेत. चंदन, गांजा तस्करी, मटका, खून, मारामारी, दरोडे, वाटमाऱ्या अमानवी कृत्ये, जाळपोळ, लूट, ऊसतोड मजूर व साखर कारखान्यांच्या उचलीच्या फसवणुकीचे प्रकार यासारख्या गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कार्यक्षेत्रात संवेदनशील गावांची संख्या अधिक आहे. करेवाडी, संख, कोंत्यावबोबलाद, पांढरेवाडी, उमदी, पारधे वस्ती, तिकोंडी भागातील गुन्हेगार व कर्नाटकातील सिध्देवाडी, आरकेरी, चडचण, कन्नूर या भागातील गुन्हेगारांचे कनेक्शन इथल्या भागात आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या घटनेतून पुढे येतोय.
कर्नाटक सीमा जवळ असल्यामुळे गुन्हा करून आरोपी पळून जातात. तसेच एखाद्याचा खून करून पुरावा नष्ट करणे, पोलिसांचा ससेमीरा चुकविण्यासाठी मृतदेह कर्नाटकात टाकले जातात. यामुळे तपास प्रक्रियेत गुंतागुंत निर्माण होते. विस्तार मोठा असल्याने भविष्याचा विचार करून गुन्हेगारांवर चाप लावायचा असेल तर, तालुक्यात संख्या रूपाने तिसरे पोलीस ठाणे तातडीचेच आहे. कोणबगी, तिकोंडी, धुळकरवाडी, कागनदी, कोंत्यावबोबलाद हा भाग अतिशय दुर्गम आहे. हा संपूर्ण परिसर कर्नाटक सीमेवर येतो. डोंगराळ स्थिती, रस्त्यांची दयनीय अवस्था, छोटी गावे, दूरवर असणाऱ्या वाड्या-वस्त्या यामुळे या भागात एखादा गुन्हा घडला तर तो उमदी पोलिसांपर्यंत पोहोचून पोलीस तिथवर येईपर्यंत गुन्हेगार पसार झालेले असतात. शिवाय इतक्या मोठ्या भागाला सध्या उपलब्ध असणारी जी पोलिसांची कुमक आहे ती अतिशय कमी आहे.
या भौगोलिक परिस्थितीचा विचारही करण्याची गरज नाही. या गावांना उमदी पोलीस ठाणे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नवीन संख पोलीस स्टेशनची गरज आहे.
पुन्हा आसंगी तुर्क नको
राज्याला हादरवून सोडणारी आसंगी तुर्क येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना जिवंत जाळण्याची घटना दुपारी तीन वाजता झाली. त्याची माहिती सायंकाळी सहा वाजता उमदी पोलीस ठाण्याला मिळाली. या घटनेची माहिती सांगली मुख्यालयाला अगोदर समजली होती. विरोधी पक्षांनीही याची मागणी केली होती. २0१0 मध्ये नव्याने प्रस्ताव सादर झाला. यात उमदी पोलीस ठाण्याकडील २0 गावे व जत पोलीस ठाण्याकडील १४ गावांचा समावेश आहे.
बऱ्याच दिवसांपासून संख पोलीस ठाण्याची मागणी आहे. परिसरातील लोकांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे. अवैध धंद्यांना आळा बसणार आहे. पोलीस ठाण्याचा पाठपुरावा सुरू आहे.
— चंद्रशेखर रेबगोंड
स्वाभिमानी शेतकरी संघटना, अध्यक्ष