सांगली, मिरजेतील आठ नगरसेवक राणेंच्या भेटीला, निवडणुकीची तयारी : महापालिका लढवू- नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:16 PM2017-12-09T16:16:49+5:302017-12-09T16:24:57+5:30
सांगली महापालिकेच्या आठ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. सांगली, मिरजेतील आठ नगरसेवक राणेंच्या गळाला असे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.
सांगली : महापालिकेच्या आठ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. सांगली, मिरजेतील आठ नगरसेवक राणेंच्या गळाला असे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.
राणे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून शहरात विविध पक्षांमधील हालचाली गतिमान झाल्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राणे यांच्या दौऱ्याच्या तयारीत व्यस्त होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच सांगली दौरा होता. त्यामुळे त्यांची भेट घेण्यास येणाऱ्या लोकांबाबत उत्सुकता होती. काही नगरसेवकांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ही बातमी सर्वत्र पसरल्यामुळे या नगरसेवकांनी वेळेत बदल करून सकाळी आठ वाजता विश्रामबाग परिसरातील हॉटेलमध्ये राणे यांची भेट घेतली. राणे यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले की, सर्वच ठिकाणी मला अन्य पक्षातील अनेक लोक भेटत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचीही चर्चा होत आहे.
सांगलीतही असाच अनुभव आला. येथील काही नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी मला भेटून गेले. महापालिका निवडणुकीसंदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. प्रसंगी ही निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. पक्षात सरसकट कोणालाही प्रवेश देण्याची आमची भूमिका नाही.
महापालिका निवडणुकीपूर्वी काही महिने मी पुन्हा सांगलीला येणार आहे. त्यावेळी केवळ महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेईन. जे लोक आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत, त्यांची चाचपणी केली जाईल. योग्यता पाहूनच आम्ही प्रवेश देऊन महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवायची की कोणाशी आघाडी करून लढवायची, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचवेळी पक्षात येऊ पाहणाऱ्या लोकांची स्थिती व एकूणच वातावरण पाहून आम्ही निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवकांच्या भेटीची चर्चा
महापालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी, निरंजन आवटी, सुरेखा कांबळे, आयुब पठाण, बाळासाहेब गोंधळी, राष्ट्रवादीचे अल्लाउद्दीन काझी, नितीन शिंदे, हेमंत खंडागळे (नगरसेविका पती) यांनी नारायण राणे यांच्याशी घेतलेली भेट दिवसभर चर्चेचा विषय होती.
भाजपचे युवराज बावडेकर यांनीही राणे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील आणि शेखर इनामदार यांनीही राणे यांचे स्वागत करीत त्यांच्याशी संवाद साधला, मात्र घटक पक्षाच्या नेत्याचे स्वागत करणे हा शिष्टाचार असल्याचे इनामदार यांनी स्पष्ट केले.
आवटी यांच्याकडून दुजोरा नाही
आवटी पिता-पुत्रांनी राणे यांची भेट घेतल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. यासंदर्भात आवटी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशी कोणतीही चर्चा झाल्याचा इन्कार केला.
वसंतदादा स्मारकाचे दर्शन
राणे यांनी सकाळी नऊ वाजता गणपती मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी नगरसेविका आशा शिंदे यांचे पती नितीन शिंदे, माजी नगरसेवक धनंजय सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राणे यांनी वसंतदादा
स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी वसंतदादांचे नातू विशाल पाटील उपस्थित होते.
नियोजनातही अन्य पक्षीय
राणे यांच्या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन सम्राट महाडिक यांनी केले होते. त्यांच्याबरोबर नजीर वलांडकर, लालू मेस्त्री, आसिफ बावा, वाहिद बेग हेसुद्धा नियोजनात होते. अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा वावर याठिकाणी दिसून आला. संपूर्ण दौऱ्यात राणे यांच्यासोबत सम्राट महाडिक होते. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सांगलीत रंगली होती.
लोकमतचे वृत्त तंतोतंत खरे
सांगली, मिरजेतील आठ नगरसेवक राणेंच्या गळाला असे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. राणे यांच्या दौऱ्यावेळी हे नगरसेवक त्यांना भेटल्यामुळे वृत्त तंतोतंत खरे ठरले. काही नगरसेवकांनी भेटीच्या चर्चेस इन्कार केला असला तरी संयोजनातील प्रमुख कार्यकर्त्यांनी या भेटीच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.