आम्हाला किती जागा द्यायच्या नरेंद्र मोदी, अमित शहा ठरवतील - राजेश क्षीरसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:15 PM2023-04-03T17:15:24+5:302023-04-03T17:15:57+5:30
शिल्लक शिवसेनेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही
सांगली : कोणाच्या काहीतरी बोलण्याने शिवसेनेच्या जागा कमी होणार नाहीत. आमच्या जागांचा फैसला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती आहे, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, शिवसेना व भाजपमध्ये आता कोणताही वाद नाही. राज्यात कोणीतरी काहीतरी बोलत असते. त्यामुळे कोणाच्या मतावर विधानसभेचे जागावाटप होणार नाही. मोदी व शहा हेच जागावाटपाचे सूत्र ठरवतील.
सध्या शिवसेना व भाजपमध्ये चांगला समन्वय आहे. पूर्वीच्या युतीत हा समन्वय कधीच दिसला नव्हता. त्यामुळे आता गतीने कामे होत आहेत. लाेकाभिमुख निर्णय हाेत आहेत. लाेकांनाही सरकार आपले वाटत आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघातील पक्षबांधणीची जबाबदारी माझ्याकडे आहे. या ठिकाणी पक्षाचे काम चांगले आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमची शिवसेना ताकदीने उतरेल.
काही संस्थांवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, यासाठी प्रयत्न राहील. जिल्हा नियोजन समितीमध्ये रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय होईल. निधी वाटपात आम्ही कधीही राजकारण करणार नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसवाल्यांना पैसा व पद महत्त्वाचे वाटते. त्यामुळे सतत ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत असतात. नियोजन समितीच्या निधी वाटपात राजकारण होत असल्याची त्यांची टीका अयोग्य आहे.
पूर्वीचे संपर्कप्रमुख कळलावे
यापूर्वीच्या शिवसेनेत कुणीतरी बाहेरचा संपर्कप्रमुख यायचा व नुसती भांडणे लावायचा. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी हा कार्यक्रम केला, अशी टीका करीत क्षीरसागर यांनी नितीन बानुगडे-पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
विमानतळासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ उभारण्याच्या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
सीमा प्रश्न लवकरच सुटणार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीच्या बैठका होत आहेत. मी त्या समितीत आहे. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घातल्याने लवकरच प्रश्न सुटेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
ती तर शिल्लक शिवसेना
संजय राऊत यांनी ठाकरेंकडील शिवसेना संपवली आहे. आता शिल्लक शिवसेनेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही, असे क्षीरसागर म्हणाले.