नरेंद्र मोदी फक्त भारताची नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज : मंत्री चंद्रकांत पाटील
By संतोष भिसे | Published: November 27, 2023 04:51 PM2023-11-27T16:51:31+5:302023-11-27T16:51:56+5:30
काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत
सांगली : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी निवडून येणे ही फक्त भारताचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची गरज असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगलीत सोमवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, जगभरात सुरू असलेल्या युध्दांदरम्यान मोदी यांनी मध्यस्थी केली, त्यामुळे तीन दिवस युध्दविराम मिळाला. हे फक्त मोदीच करु शकतात. पण काही मंडळी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या गाडीला चालकच नाही हेच त्यांच्या ध्यानी येत नाही. कोणीही येतो आणि त्यांच्या गाडीत बसतो. पण चालक नसलेली ही गाडी धावणार कशी?
ते म्हणाले, अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने माझे महत्व कमी होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मी एक कोरे पाकिट आहे. त्यावर संघटना कोणता पत्ता लिहिल, तेथे जायचे एवढेच माझे काम आहे. पक्षात शिस्त असल्याने पक्षफुटीचा प्रसंग कधीच भाजपवर आलेला नाही. काही मंडळी नाराज होऊन बाजूला गेली असली, तरी त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कामाची पद्धत वेगवेगळी आहे. दोघेही कामासाठी योग्य आहेत. फडणवीस यांची संवेदनशीलता महापुरावेळी दिसून आली, तर पवार यांच्या कामाचा उरक मोठा आहे. प्रशासनावर त्यांचा वचकही आहे.
चर्चेतूनच मार्ग निघू शकतो
पाटील म्हणाले, फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले होते, मात्र महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. महाराष्ट्रात सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची संतांची शिकवण आणि परंपरा आहे. यामुळे तेढ निर्माण होईल असे वक्तव्य टाळून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेला बसावे. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो.