नरेंद्र मोदींनी पाहिले सांगलीचे बेदाणा सौदे, सांगलीच्या सौद्याचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 07:08 PM2018-03-17T19:08:50+5:302018-03-17T19:08:50+5:30
सांगली : शेतीमालाला सुलभ बाजारपेठ निर्माण व्हावी व शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-नाम (राष्ट्रीय कृषी व्यापार) अंतर्गत विशेष आॅनलाईन बेदाणा सौदा
सांगली : शेतीमालाला सुलभ बाजारपेठ निर्माण व्हावी व शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-नाम (राष्ट्रीय कृषी व्यापार) अंतर्गत विशेष आॅनलाईन बेदाणा सौदा शनिवारी उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एका कृषी प्रदर्शनातून त्यांनी शेतकऱ्यांसमवेत सांगलीचे सौदे पाहिले.
या सौद्याच्या प्रक्रियेची दिल्ली येथून पंतप्रधान कार्यालय व पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. देशातील सर्वात नियोजनबध्द सौदा पार पडल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयानेही सांगलीतील सौद्याची दखल घेत प्रशंसा केली.
केंद्र सरकारच्यावतीने शेतीमालाला देशभरातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी व शेतकºयांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी ई-नाम प्रणाली अस्तित्वात आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याची सुरुवात झाली असून, शनिवारी स्वत: पंतप्रधान मोदी या प्रक्रियेची पाहणी करणार होते. यासाठी विशेष सौद्याचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे देशातील पाच राज्यातील पाच बाजार समित्यांतील आॅनलाईन सौदे यावेळी झाले, त्यात महाराष्टÑातून सांगली बाजार समितीला बहुमान मिळाला होता.
मार्केट यार्डात झालेल्या या सौद्यात बेदाण्याची गेट एंट्री, आऊट एंट्री, अडत्या, व्यापारी, शेतकºयांची नोंदणी झाली. सौदे हॉलमध्ये मोठ्या स्क्रीनवर बेदाण्याचे सॅम्पल दाखविण्यात आले. त्यानंतर खरेदीदार व व्यापाºयांनी सॅम्पल पाहून दर मोबाईल अॅपवर नमूद केला. या संपूर्ण प्रक्रियेची आॅनलाईन पाहणी दिल्ली येथून होत होती.
देशात एकाचवेळी पाच राज्यातील पाच बाजार समित्यांमध्ये सौदे सुरू होते. यात सांगलीच्या सौद्याचे नियोजन सर्वात उत्तम झाल्याची प्रतिक्रिया यावेळी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाºयांनी दिली. या संपूर्ण प्रक्रियेची पंतप्रधान स्वत: पाहणी करणार होते मात्र, ती होऊ शकली नसली तरी त्याचा व्हिडीओ ते पाहणार आहेत.
यावेळी सभापती दिनकर पाटील, उपसभापती तानाजी पाटील, ई-नाम आॅक्शन प्रणालीचे राज्याचे समन्वयक अरिंदम पॉल, पणन मंडळाच्या संगणक विभागाचे सहा. सरव्यवस्थापक एम. सी. लोखंडे, संचालक वसंतराव गायकवाड, दीपक शिंदे, दादासाहेब कोळेकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, के. सी. फटांगरे, ए. जे. पवार, तानाजी नांगरे, सचिव प्रकाश पाटील, सहा. सचिव एन. एम. हुल्याळकर, सांगली-तासगाव बेदाणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज मालू, विनायक हिंगमिरे, जमनादास ठक्कर, कांतिभाई पटेल, राजेंद्र कुंभार आदी उपस्थित होते.