‘नारीशक्ती दूत’ ॲप बंद; लाडकी बहीणचे अर्ज अंगणवाडीसेविका भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 05:39 PM2024-09-11T17:39:34+5:302024-09-11T17:39:56+5:30
अंगणवाडीसेविकांना प्रशासनाकडून सूचना नसल्यामुळे गोंधळ
सांगली : राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा केला असला, तरी सध्या या अर्ज भरण्याचे ॲप आणि पोर्टल चालत नसल्यामुळे या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांमधून सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होऊ लागला. लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, अंगणवाडीसेविका अर्ज भरणार आहेत. दरम्यान, अंगणवाडीसेविकांना प्रशासनाकडून सूचना नसल्यामुळे त्याही अर्ज भरून घेत नाहीत.
दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली, यासाठी महिलांना प्रतिमाह दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली. यासाठी सरकारने निश्चित केलेल्या अटींमध्ये वारंवार बदल केला आहे. जिल्ह्यातील सात लाख २० हजार महिलांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी सात लाख महिलांच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. शासनाने नव्याने विकसित केलेले नारीशक्ती दूत हे ॲप चालत नाही. लाडकी बहीण पोर्टलही गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे अर्ज भरणाऱ्या महिला त्रस्त आहेत.
ज्या महिलांनी ॲप व पोर्टलद्वारे अर्ज अपलोड केलेले आहेत, त्यापैकी काही महिलांना त्यांचे अर्ज मंजूर झाल्याचा संदेश आला, तर काही महिलांना त्यांचे अर्ज नामंजूरचा संदेश मिळाला. काही महिलांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्या महिला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी धावाधाव करू लागल्या आहेत. मात्र, पोर्टल आणि ॲप बंद असल्यामुळे महिलांची डोकेदुखी वाढली आहे.
अर्ज नामंजूर झालेल्या महिलांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता ॲपवरून अर्ज न भरता थेट अंगणवाडीसेविकाच अर्ज भरतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत अंगणवाडीसेविकांना अद्यापही कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकता
लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून अंगणवाडीसेविका अर्ज भरणार आहेत. त्यामुळे अंगणवाडीसेविकांच्या कामात आणखी एक भर पडल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.