नरवाड येथे बसखाली सापडून वृद्धा ठार
By Admin | Published: May 24, 2014 12:37 AM2014-05-24T00:37:33+5:302014-05-24T00:41:45+5:30
बसथांब्यावरील प्रकार : चालक-वाहकाचा पळ
नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे बसखाली सापडून श्रीमती रुक्मिणी नानासाहेब निंबाळकर (वय ८६) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान महालक्ष्मी देवालयाजवळील बसथांब्यावर घडला. श्रीमती निंबाळकर मिरजेहून नरवाडला बसने (क्र. एमएच १२ ईएफ ६९०९) येत होत्या. महालक्ष्मी देवालयाजवळील बसथांब्यावर उतरत असताना त्या अचानक घसरून बसखाली गेल्या. चालकाच्या ते लक्षात आले नाही. मिरजेकडे परतण्यासाठी बस तशीच पुढे गेल्याने पुढील व मागील दोन्ही चाके श्रीमती निंबाळकर यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या बसखाली सापडल्यानंतर घटनास्थळापासून बस ५५ फूट अंतरावर जाऊन थांबली होती. बसच्या चाकाभोवती मांसाचे तुकडे चिकटलेले दिसत होते. बसच्या चालक-वाहकांनी घटनास्थळावरून पळ काढला. निंबाळकर यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच नेताजीराव निंबाळकर यांच्या त्या आई होत. मिरज ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. (वार्ताहर)