नथुराम गोडसेचे उदात्तीकरण देशासाठी घातक
By admin | Published: December 9, 2015 11:59 PM2015-12-09T23:59:40+5:302015-12-10T00:54:05+5:30
श्रीपाल सबनीस : सांगलीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन
सांगली : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत. अशा प्रवृत्ती कायमच्याच संपल्या पाहिजेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी सांगलीत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात व्यक्त केले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्यावतीने अण्णासाहेब लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त येथील राजमती भवनात जयंती समारंभ, सेवक स्नेहमेळावा व ‘आदर्श सेवक’ पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.श्रीपाल सबनीस म्हणाले, मार्क्सचा विचार घेऊन कॉ. गोविंद पानसरे उभे राहिले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार घेऊन नरेंद्र दाभोलकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार घेऊन एम. एम. कलबुर्गी उभे राहिले होते. मात्र त्यांची हत्या करण्यात आली. हा भारतीय लोकशाहीचा, तुमचा आणि आमचा खून आहे. ही प्रवृत्ती आणि ही परंपरा कायमची संपली पाहिजे. २0१५ मध्ये गोडसेच्या नावाने सोहळे साजरे केले जात आहेत. ही गोष्ट हिंदूंचा उन्माद बाळगणाऱ्या लोकांसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही. खुनी सनातनी संस्कृतीचा सर्वकालीन धिक्कार करायला हवा. सरकारच्या संवेदना का संपल्या आणि कोणी मारल्या, हे आपणास कळेनासे झाले आहे. हे वातावरण चांगले नाही. महापुरुषांना जातीच्या चौकटीत बांधण्याचा आणि त्यांची वाटणी करण्याचा प्रकार थांबणार का? जाती आणि धर्माच्या पलीकडचे विचार आपण कधी आत्मसात करणार आहोत की नाही? जातीच्या पलीकडे माणूस आहे की नाही? कलेला कधी जात आणि धर्म नसतो. तसे असते तर बिसमिल्ला खाँसाहेबांची शहनाई प्रत्येकजाती-धर्माच्या सोहळ्यामध्ये वाजली नसती. कला आणि संस्कृतीला अशा बंधनात बांधणेही चुकीचे आहे. कलेला, सौंदर्याला आणि विचारांना वैश्विक व्यापकता आहे. चुकीच्या प्रवृत्तींना भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी उत्तर दिले पाहिजे. हे विचारच भविष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तन घडवू शकतात. विधायक विचार, विधायक संस्कृती आणि समता, बंधुता जपणारी परंपरा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले. स्वागत व पाहुण्यांचा परिचय सुहास पाटील यांनी करून दिला. यावेळी उपप्राचार्य पद्मजा चौगुले, मुख्याध्यापिका मीनाक्षी वाजे, गणपती कुंभार, निर्मलकुमार सगरे आणि विद्यार्थी प्रणव विजय चव्हाण यांना सबनीस यांच्याहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. व्ही. बी. कोडग, अॅड. विजयकुमार सकळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘इसिस’चा धोका : चिंतेचा विषय
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे कुचकामी नेतृत्व आहे. भविष्यात याठिकाणची सत्ता लष्कराच्या हाती जाईल आणि चुकून लष्कराची अण्वस्त्रे लष्कर-ए-तोयबा किंवा ‘इसिस’सारख्या संघटनांच्या हाती गेली, तर जगाचा एकतृतियांश भाग कायमचा संपुष्टात येईल. म्हणून जागतिक पातळीवर इसिस व अन्य दहशतवादी प्रवृत्तींचा धोका सर्वांनाच आहे, असे मतही सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.