सांगली: भिलवडीनंतर 'या' गावात ग्रामपंचायीकडून दररोज होतेय राष्ट्रगीत गायन, महाराष्ट्रातील पहिलेच गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 12:48 PM2022-10-22T12:48:22+5:302022-10-22T13:00:06+5:30
देशप्रेमाचा हा अनोखा पायंडा सगळीकडे कौतुकाचा विषय झाला आहे.
विनोद पाटील
शिगाव : शिगाव (ता. वाळवा) येथे ग्रामस्थांच्या दैनंदिन कामकाजाची सुरुवात जनगणमन या राष्ट्रगीताने होते. देशभक्ती जोपासण्याचा वसा तसेच गावातील शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा आदर म्हणून ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित दि. १५ ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू आहे. गेले दोन महिने हा उपक्रम नियमित सुरू आहे.
सकाळचे ११ वाजले की, सायरन वाजतो. त्यानंतर पब्लिक ऑडिओ सिस्टीममधून राष्ट्रगीत वाजते. लोक असतील त्या जागीच उभे राहतात आणि राष्ट्रगीतानंतर ‘भारत माता की जय!’ असा जयघोष करून आपापले काम सुरू करतात. देशप्रेमाचा हा अनोखा पायंडा सगळीकडे कौतुकाचा विषय झाला आहे.
नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकीत होण्यासारखेच. मात्र, इथल्या ग्रामस्थांसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा व आपल्या रोमितला आदरांजली देण्याचा प्रयोग आहे. सात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गावातील नागरिकांमध्ये देशभक्तिचा उत्साह जागृत करण्याचे काम सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत प्रशासनाकडून होत आहे.
जिल्ह्यातील भिलवडीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून व्यापारी संघटनेकडून नित्यनियमाने सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रगीत गायले जाते. पण ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेत या उपक्रमाचा रीतसर ठराव मंजूर करून राष्ट्रगीत गायले जाणारे शिगाव हे कदाचित महाराष्ट्रातील पहिलेच गाव असेल. शिगावमध्ये हा अभिनव उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सदैव करणार आहोत. - उत्तम गावडे, सरपंच, शिगाव