राष्ट्रीय महामार्ग असे असतात का’? : वाहनधारक, दर्जेदार रस्त्याची मागणी सांगली-तुंग रस्ता दुरवस्थेवर संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:20 PM2018-08-21T23:20:28+5:302018-08-21T23:27:48+5:30

राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या अत्यंत दर्जाहीन अशा सांगली-तुंग रस्त्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा कळीचा बनला असून,

National highways are like this? Vehicle owners question: Demand for quality roads Sangli-Tung road | राष्ट्रीय महामार्ग असे असतात का’? : वाहनधारक, दर्जेदार रस्त्याची मागणी सांगली-तुंग रस्ता दुरवस्थेवर संताप

राष्ट्रीय महामार्ग असे असतात का’? : वाहनधारक, दर्जेदार रस्त्याची मागणी सांगली-तुंग रस्ता दुरवस्थेवर संताप

googlenewsNext

अविनाश कोळी ।
सांगली : राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या अत्यंत दर्जाहीन अशा सांगली-तुंग रस्त्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा कळीचा बनला असून, राष्टय महामार्ग असा असतो का?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

सांगलीवाडी ते तुंग या खड्डेमय रस्त्याच्या वेदनादायी प्रवासावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर या रस्त्याविषयीचा लोकांमधील संताप बाहेर आला. सोशल मीडियावर सर्वच पक्षीय नेते, मंत्री, खासदार, आमदार, शासकीय अधिकारी, संबंधित विभाग यांच्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पेठ ते सांगली या रस्त्यासाठी वर्षापूर्वी मोठे आंदोलन उभारल्यानंतर त्याची दखल घेत हा रस्ता राज्य महामार्गातून राष्टÑीय महामार्गात घेण्यात आला. खराब रस्त्यामुळे लोकांच्या जिवाशी खेळ सुरू असतानाही तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. तरीही गेले वर्षभर हा खेळ तसाच सुरू राहिला. सांगलीवाडी टोल नाका ते तुंग या रस्त्याचे बांधकाम पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित असताना, ते रेंगाळत राहिले. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत अजूनही हा बाजार तसाच कायम आहे.
टोल नाका बंद करण्यासाठी ज्यापद्धतीने आंदोलन उभारले गेले तसे आता शहराला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुर्दशेबद्दलही आंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

वर्षानुवर्षे पॅच : दर्जात्मक सुधारणा कधी?
जिल्ह्यातील हा महत्त्वाचा महामार्ग असतानाही त्याच्या विकासाकरिता गेल्या कित्येक वर्षात कोणीही लक्ष दिले नाही. एकदाच केलेल्या डांबरीकरणाला वर्षानुवर्षे दुरुस्तीचे पॅच जोडण्यातच येथील लोकप्रतिनिधींनी धन्यता मानली. त्यामुळे या रस्त्यावर अपघातात मरणारे, रस्त्याच्या खस्ता खात शरीराचीसुद्धा रस्त्याप्रमाणेच चाळण करून घेणारे नागरिक निमूटपणे या गोष्टी सहन करीत गेले. आजही या रस्त्याचा वनवास संपलेला नाही. आजही वाहनांच्या नुकसानीबरोबरच शारीरिक हानी ही सवयीची करून येथील नागरिक, वाहनधारक जगत आहेत. त्यांच्या वेदना जाणून घेण्याची तसदी एकाही नेत्याने घेऊ नये, ही दुर्दैैवी गोष्ट आहे.

तांत्रिक बाबींचा विचार अधिक होणे आवश्यक
रस्ते बांधकामाच्या पद्धतीत जागतिक स्तरावर अनेक बदल होत आहेत. तरीही जिल्ह्यातील रस्त्यांच्या बांधकामाच्या पद्धतीत कोणताही बदल होताना दिसत नाही. रस्त्यांचा डहाळ, पाणी निचºयाची व्यवस्था, वक्रता त्रिज्या (रेडियस आॅफ कर्व्हेचर) अशा कोणत्याही गोष्टींचा समावेश रस्ते बांधकामावेळी केला जात नसल्याचे दिसून येत आहे. सांगली-पेठ रस्त्याचा विचार केला तर दुतर्फा ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. काळ््या मातीतून गेलेल्या या रस्त्याचे बांधकाम पाणी साचून खचत आहे. त्यामुळेच तांत्रिक गोष्टींचा विचार करून रस्ते अधिक बळकट करण्याची गरज आहे.

सांगली-पेठच्या डीपीआरचे काम अपूर्णच...
सांगली-पेठ रस्ता सिमेंट कॉँक्रिटचा करण्यासाठी डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अहवाल पूर्ण होणार कधी? तज्ज्ञांचे मते या कामासाठी चारशे कोटींहून अधिक खर्च येऊ शकतो. मात्र राष्टÑीय महामार्ग म्हणून पक्का रस्ता करताना आता दर्जात्मक पातळीवर जास्त काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठे रस्ते म्हटले की खाबूगिरीला जास्त प्राधान्य दिले जाते आणि दर्जात्मक पातळीवर असे मोठे रस्ते अयशस्वी ठरतात.

 

सोशल मीडियावर खिल्ली

सांगली-तुंग स्त्याची दुरवस्था पाहून त्या मार्गावर जायचे धाडससुद्धा होत नाही
- रवी जाधव

रस्ता दुरुस्त करता येत नसेल तर, रस्त्याच्या दोन्ही बाजूस कब्रस्थान, स्मशानभूमीची व्यवस्था करण्याची मागणी सरकारकडे करायला हवी
- आयुब पटेल, सांगली

आपण सर्वांनी थोडेसे प्रयत्न केले तर तुंग ते सांगलीपर्यंतचा रस्ता जगातला सर्वात खराब रस्ता म्हणून गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदला जाऊ शकतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न करावेत. - दीपक राधेह

ज्या रस्त्याने आम्हा तुंगकरांना सांगली-तुंग हे अंतर वीस मिनिटाचे होते, ते आता पाऊण तासाचे झाले आहे. डिग्रज ते तुंग इतके छोटे अंतरही आता २0 मिनिटाचे झाले आहे. - चिन्मय हंका


तुंग ते सांगली रस्ता पार करणे म्हणजे जग जिंकल्यासारखे आहे. या रस्त्याला कसला दर्जा द्यायचा हाच प्रश्न आहे.
- सुहास कर्नाळे

 

वास्तविक रस्ते बांधकाम करताना त्याच्या दीर्घकालीन टिकाऊपणाची सोय केली जात नाही. रस्त्यावर पडणाºया पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्थासुद्धा केली जात नाही. रस्त्याच्या दुतर्फा गवताच्या रांगाच्या रांगा दिसतात. पाण्याचा निचराच होत नसल्याने, मग रस्ते खचणे, खराब होणे हे प्रकार सुरूच राहतात. त्यामुळे दीर्घकालीन दर्जेदार रस्ते तयार व्हावेत, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यासाठी रस्ते बांधणीच्या आदर्श प्रणालीचा वापर करावा.
- नानासाहेब पाटील, कासेगाव (निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट )

जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुख व अन्य प्रमुख अधिकारी हे सर्व लोक सांगलीतून पुण्याकडे जाताना हेलिकॉप्टरने जातात का? त्यांना या रस्त्यावरील लोकांचे हाल दिसत नाहीत का? त्यांनी एकतर हा रस्ता चांगला करावा अन्यथा येथील लोकांसाठी हवाई वाहतूक किंवा कृष्णा नदीतून बोटीने प्रवास करण्याची सोय करून द्यावी.
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली

एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी रस्ते अपघात कमी करण्याचे धोरण अवलंबित असताना सांगली जिल्ह्यातील रस्त्यांवरील बळींची संख्या वाढतच आहे. लोकांच्या जिवाशी जो खेळ चालू आहे त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. निविदा प्रसिद्ध होऊनही ते काम मार्गी लागत नसेल तर, त्यास जबाबदार कोणाला तरी धरायला नको का? ही परिस्थिती बदलायला हवी.
- महेश पाटील, नागरिक जागृती मंच, सांगली

Web Title: National highways are like this? Vehicle owners question: Demand for quality roads Sangli-Tung road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.