मुंबईत १५ ते १७ जून दरम्यान राष्ट्रीय विधायक संमेलन; चार हजार आमदारांचा सहभाग
By शीतल पाटील | Published: May 23, 2023 03:00 PM2023-05-23T15:00:25+5:302023-05-23T15:00:33+5:30
गोलमेज परिषदेत भारत २०४७ या विषयावर राजकीय, आधात्मिक, उद्योग, पत्रकार क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
सांगली - नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी प्रथमच देशातील ४ हजार आमदार राष्ट्रीय विधायक संमेेलनामध्ये एकत्रित येणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेेलन मुंबई येथील बीकेसी सेंटरमध्ये १५ ते १७ जून दरम्यान होत आहे, अशी माहिती आमदार सुमनताई पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
त्या म्हणाल्या की. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या त्रिसुत्रीचा उद्देश ठेऊन आयोजित संमेलनाचे उद्घाटन १६ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी संमेलनाचा समारोप होईल. संमेलनात ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकुरकर, मनोहर जोशी, विद्यमान सभापती ओम बिर्ला मार्गदर्शन करणार आहेत. एमआयटीचेअध्यक्ष राहुल कराड प्रमुख संयोजक समन्वयक आहेत.
संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजनाः शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती, मतदार संघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, विधिमंडळ कार्यप्रदर्शन, नोकरशहा आणि आमदार या विषयांवर चर्चा होणार आहे.
गोलमेज परिषदेत भारत २०४७ या विषयावर राजकीय, आधात्मिक, उद्योग, पत्रकार क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक सत्राचे अध्यक्ष पद विधानसभेचे सभापती, विधानपरिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता भूषविणार आहेत. या संमेलनासाठी आतापर्यंत देशभरातील ३८०० आमदारांची नोंदणी झाली आहे. चार हजार आमदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील उपस्थित होते.