राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये चार हजारांवर प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:28 AM2021-09-27T04:28:49+5:302021-09-27T04:28:49+5:30
सांगली : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व राज्य विधि सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी सांगलीत राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. ...
सांगली : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व राज्य विधि सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी सांगलीत राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. या लोक अदालतीस पक्षकारांनी प्रतिसाद दिल्याने चार हजार २३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात सर्वाधिक प्रकरणे ही वाहतूक नियम उल्लंघनासंदर्भात ई-चलन प्रकरणे होती.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अदालतीस प्रारंभ झाला. यावेळी पाटील यांनी जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये समझाेता घडवून आणत तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन केले.
लोकअदालतीसाठी जिल्ह्यातून ५७ पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. पॅनेलप्रमुख म्हणून कार्यरत सर्व न्यायाधीश व सेवानिवृत्त न्यायाधीश, पॅनेल सदस्य म्हणून वकिलांनी व जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सदस्यांनी कामकाज पाहिले.
लोकअदालतीच्या अगोदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन दिवस स्पेशल ड्राइव्हमध्येही प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक न्यायालयात १४२४ प्रलंबित, २२९५ दावा दाखलपूर्व आणि ५१७ स्पेशल ड्राइव्हमधील प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिन नागणे, नितीन आंबेकर, इरफान मुलाणी, राजेश मोरे, आदींनी सर्व व्यवस्था पाहिली.
पुढील राष्ट्रीय लोक अदालत ११ डिसेंबर २०२१ रोजी असल्याचे माहिती जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव विश्वास माने यांनी दिली.
चौकट
अमेरिकेतून व्हीसीद्वारे प्रकरण निकाली
या राष्ट्रीय लोकअदालतीस व्यक्तिगत अडचणीमुळे किंवा कोरोनामुळे जे पक्षकार तडजोडीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी व्हीसीद्वारे संपर्क साधण्यात आला. १९९६ वर्षातील एका प्रकरणात मूळ फिर्यादीने अमेरिकेतून व्हीसीद्वारे संपर्क साधत सांगली न्यायालयातील २५ वर्षे जुने प्रकरण समझौत्याने निकाली काढले.