जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:03+5:302021-09-23T04:30:03+5:30
सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवार, दि. २५ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय ...
सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवार, दि. २५ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या अदालतीमध्ये तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वाद, कामगार वाद, भू-संपादन, मोटार अपघात नुकसानभरपाई, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांत बॅंक, दूरसंचार, वीजबिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत. तसेच ट्रॅफिक ई-चलन केसेसही ठेवल्या जाणार आहेत.
कोरोना संसर्ग लक्षात घेता सर्व वकील, पक्षकार, कर्मचारी यांनी योग्य ती काळजी घेऊन उपस्थित राहावे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत-जास्त प्रकरणे ठेवत प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विश्वास माने यांनी केले आहे.